रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

महाजालावर माय मराठी

 ‘मराठी राजभाषा दिन’ निमित्त लेख 



महाजालावर माय मराठी 


                आज मराठी भाषा जागतिक पातळीवर दहाव्या क्रमांकाची प्रमुख भाषा तर भारतातील प्रमुख 22 अधिकृत भाषांमधील तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे.जागतिकीकरण व माहिती तंत्रज्ञानाच्या या काळात इंटरनेटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.माहितीचा खजिना 'न भूतो न भविष्यती' अशा अविश्वसनीय पध्दतीने इंटरनेटवर वाढतो आहे.तंत्रज्ञानाच्या या बहुआयामी प्रगतीमुळे मनुष्याला ज्ञान-विज्ञानाच्या विविध शाखांमधील माहितीची देवाणघेवाण करणे सुलभ झाले आहे. जगभरात अँड्रॉइड मोबाईल वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.त्यामुळे व्हाटसएप्प,फेसबुक,ट्वीटर इ.विविध सामाजिक माध्यमे व यूट्यूब,गुगल,विविध अप्लीकेशंस इ.चा वापर वाढतो आहे.मनुष्याच्या दैनंदिन भाषिक व्यवहाराबरोबरच इंटरनेटवरील भाषिक व्यवहार ही महत्वाचे ठरणार आहेत.अशा या भवतालच्या वातावरणाच्या अनुषंगाने ज्यावेळी मराठी भाषेच्या संदर्भात आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येते की मराठीला डिजिटल दुनियेत आपल्या माहितीचा, ज्ञानाचा खजिना वाढविणे आवश्यक ठरणार आहे.त्यासाठी शासकीय,निमशासकीय,खाजगी, संस्थात्मक तसेच वैयक्तिक पातळीवर ही प्रयत्न करणे गरजेचे आहे.  

                महाराष्ट्र शासनाने आपल्या भाषा विभागाच्या वेबसाईट वर सुमारे 434 दुर्मिळ मराठी ग्रंथ पीडीएफ मध्ये वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.तसेच राज्य मराठी विकास संस्थेची  https://rmvs.marathi.gov.in/ या  वेबसाईटवर 500  हून अधिक मराठीची पुस्तके पीडीएफ मध्ये व विं.दा.करंदीकर यांच्या 155,कुसूमाग्रज यांच्या 140 कविता व यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ व समर्थ रामदास यांचे दासबोध ऑडिओ रूपात (श्राव्य) उपलब्ध करून दिले आहे.त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांनी आपल्याhttps://www.masapapune.org/ या वेबसाईटवर 150 हून अधिक दुर्मिळ मराठी ग्रंथ उपलब्ध करून दिले आहेत व 2014 पासून 2020 पर्यंतचे महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे अंक उपलब्ध करून दिले आहेत.भाषा संचालनालयाने https://directorate.marathi.gov.in/ या वेबसाईटवर परिभाषा कोश उपलब्ध करून दिले आहेत. तसेच भाषा संचालनालयाने  मुख्य कोशांव्यतिरीक्त 30 इतर परीभाषा कोशांचे एकत्रीत संकलन https://shabdakosh.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर ठेवले असून तिथे ह्या 38 व इतर विभागांच्या शब्दकोशातील 400000 हून अधिक शब्दांचा समावेश आहे.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेली 400 हून अधिक पुस्तके वाचकांसाठी (https://sahitya.marathi.gov.in/ या वेबसाईटवर PDF, Mobi, EPub या पोर्टेबल फॉरमॅटस् मधे  विनामूल्य उपलब्ध केली आहेत.त्याचबरोबर शासकीय विभाग ,विविध विद्यापीठे, मंडळे, संस्थांच्या वेबसाईटस या मराठीतून दिसून येताहेत. एकूणच शासकीय पातळीवर ही मराठीच्या या आंतरजालीय समृद्धीसाठी विविध प्रकारचे प्रयत्न होताना दिसताहेत.

                अलीकडच्या काळात जनमानसात विविध सामाजिक माध्यमे, यूट्यूब,गुगल,फेसबुक इ.चा वाढता वापर पाहता त्यामध्ये ही युनिकोडच्या आगमनाने मराठीसह इतर भारतीय भाषांचे महाजालीय वैभव वाढते आहे. जोपर्यंत संगणकावर देवनागरी लिपीचा वापर होत नव्हता तोपर्यंत इंटरनेटवरील मराठी भाषेच्या प्रचार,प्रसार अन् विकासाला बाधा येत होती.पण सी-DAC सारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन युनिकोडचा आविष्कार केला अन् ख-या अर्थाने विकासाला चालना मिळाली. म्हणजेच युनिकोडच्या आगमनाने मराठीसह इतर भारतीय भाषांचे इंटरनेटवरील प्रचार आणि प्रसाराच्या  कार्याची व्याप्ती कैक पटीने  वाढणार आहे. साधारण पुणे 2005 मध्ये स्थापन झालेल्या यूट्यूब सारख्या वेबसाईट ने जगभरातील इंटरनेट वापरकर्त्याला आपल्याकडे आकर्षित केले आहे. विचारवेध,आ.ह.विचारधन,साहित्य मराठी,विश्व मराठी परिषदेचे विश्व मराठी वाणी,बी बी सी न्यूज मराठी, दूरदर्शन सह्याद्री व इतर अनेक चानेल्स  त्याचबरोबर  मनोरंजन,पाककला, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, साहित्य,कला,क्रीडा इ.अनेक क्षेत्रातील मराठी व्हिडीओ  दिसून येत आहेत.परंतु अजून नवनवीन क्षेत्रातील व्हिडीओजची संख्या वाढविणे गरजेचे आहे.मधुरा रेसिपीज, राजश्री मराठी,विनायक माळी,भारतीय डिजिटल पार्टी,जोश टॉक्स इ.सारखे अनेक मराठी चॅनेल दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसताहेत ही भाषेच्या अनुषंगाने जमेची बाजू आहे.

                अक्षरनामाhttps://www.aksharnama.com/,मराठीसृष्टीhttps://www.marathisrushti.com मराठीवर्ल्ड  http://marathiworld.com/ इत्यादिसारखी अनेक मराठी पोर्टल्स राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक इ. विविध क्षेत्रातील लेखनाला अभिव्यक्ती देताहेत.तसेच मराठी विकिपीडिया हा सर्वात मोठा माहितीचा ऑनलाईन स्त्रोत आहे. गुगल वर मराठी विकिपीडिया मध्ये 69814 लेख असून त्याची पृष्ठ संख्या 435000 हून जास्त झाली आहे.ही वाढ  लक्षणीय झाली असली तरी अजून खूप होणे गरजेचे आहे असे वाटते. मराठी विश्वकोश ऑनलाइन उपलब्ध झाला आहे. फेसबुक,ट्विटर सारख्या सामाजिक माध्यमातून ही विविध क्षेत्रातील मंडळी मराठीतून व्यक्त होताहेत ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.मराठी प्रकाशकानी,विविध वर्तमान पत्रांनी आपापल्या  वेबसाईट तयार केलेल्या आहेत.तसेच विविध समाज माध्यमांवर ही खाते काढलेलं आहे ही काळानुरुप कात टाकण्याची प्रक्रिया मराठीच्या महाजालीय विकासाला अनुकूल अशी आहे.स्टोरीटेल,प्रतिलिपी इ.सारखी तसेच पत्रकारिता,भाषा, साहित्य, मनोरंजन, पाककला इ. विविध क्षेत्रातील मराठी अप्लिकेशन्स मराठीचे महाजालविश्व समृद्ध करत आहेत.

                युनिकोड संकेत प्रणालीमुळे महाजालावर मराठीतून व्यवहार करणे सहजसुलभ झाले आहे.मराठी नव्या काळाची नवी आव्हाने स्विकारत आपला विकास गतीने करत आहे.इंटरनेटच्या माध्यमातून संगणक व मोबाईल वर मराठीचा वापर वाढतो आहे ही बाब स्वागतार्ह आणि आश्वासक आहेच पण तंत्रज्ञानाच्या आधारे मराठीचा प्रचार आणि प्रसार वृद्धिंगत करणे आपले आद्यकर्तव्य आहे.मराठीचा दैनंदिन व्यवहारातील वापर महत्त्वाचा आहे  पण त्याचबरोबर आंतरजालावरील ज्ञानाची, माहितीची समृद्धता उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे.त्यासाठी विविध वेबसाइटस निर्मिती , ब्लॉग्स निर्मिती व लेखन, समाज प्रसार माध्यमात खाते काढणे  व लेखन, मराठी अप्लिकेशन्स निर्मिती व वापर करणे तसेच त्यामध्ये संख्यात्मक व गुणात्मक दृष्टीने वाढ करणे आवश्यक आहे.प्रत्येकाने आपल्या परीने तंत्रज्ञानाधारित देवाणघेवाणीत मराठीचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे. म्हणून आपण जर काळाची पाऊले ओळखून कालसुसंगत असे आंतरजालीय भाषिक व्यवहार वैयक्तिक,शासकीय,संस्थात्मक पातळीवर केले तर महाजालावरील मराठीचा झेंडा दिमाखात फडकल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित्त….!

-प्रा.एस.के.आतार