पुस्तक परिचय






























'

'पीळ आणि इतर कथा'- डॉ.रवींद्र ठाकूर 


        शिवाजी विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख डॉ.रवींद्र ठाकूर सर यांचा आँक्टोबर 2016 मध्ये पद्मगंधा प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेला 'पीळ आणि इतर कथा' शीर्षकाचा कथासंग्रह नुकताच वाचनात आला.यापूर्वी मी सरांची 'व्हायरस' कादंबरी वाचून खूप प्रभावित झालो होतो.आणि आता हा कथासंग्रह प्रकाशित झाल्याचे कळताच मी तो तात्काळ पोस्टाने मागवून घेतला आणि लगेचच वाचून काढला.सदर कथासंग्रहामध्ये एकूण 14 कथा समाविष्ट आहेत.ज्यामध्ये सदाण्णा,डोह,पीळ,देणगी,गर्ता,खेळी,शह,चक्र,लेखकाचं घर,आस इत्यादी कथांचा समावेश आहे.या कथा हंस,प्रतिष्ठान,उगवाई या नियतकालिकांमधून यापूर्वी प्रकाशित झालेल्या आहेत.लेखक आपल्या मनोगतात या नियतकालिकांविषयी क्रुतज्ञता स्पष्ट करताना म्हणतात," मराठवाड्यातल्या उदगीरसारख्या एका आडवळणी गावातून मी 'हंस' कडे कथा आणि ललित लेख पाठवित असे आणि कुठलीही ओळख देत नसताना अनाहूतपणे आलेलं ते साहित्य ते आवर्जून प्रकाशित करत असत."
        लेखकाला शैक्षणिक,सामाजिक,कौटुंबिक इत्यादी क्षेत्रातील आलेल्या अनुभवावर आधारित अशा या कथा आहेत.'देणगी' , 'गर्ता' , 'खेळी' इत्यादी कथा शिक्षण क्षेत्रातील वास्तव अधोरेखित करतात.शैक्षणिक जगतात जागतिकीकरण,खाजगीकरणामुळे झालेले बदल, पैशाच्या जोरावर तयार झालेले शिक्षणसम्राट,त्यांच्याकडून देणगीच्या नावाखाली होत असलेली सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक ' देणगी' कथेत शब्दबध्द केलीय.तर 'गर्ता' कथेत उच्च शिक्षित पदवीधर होऊनही नोकरीसाठी महाराष्ट्रभर विविध महाविद्यालयाच्या इंटरव्यू देत वणवण भटकणा-या, पण कधी जातीमुळे तर कधी वशिला नसल्याने झिडकारलेल्या तरुणाची होणारी फरफट व्यक्त करते.'खेळी' कथा शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात उच्च वर्णीयाकडून दलित,बहुजनांविरूध्द जातीयवादी भावनेतून अन्याय केले जातात किंवा त्यांना व्यवस्थेतून बाहेर पाठण्यासाठी षडयंत्र कसे रचले जाते याची वास्तवता ही कथा दर्शविते.तर 'आस','देवाचा जन्म' 'पतिंगरावाचा म्रुत्यू ' इत्यादी कथा समाज जीवनातील जळजळीत वास्तव अभिव्यक्त करतात.कथा वाचताना वाचक आपले देहभान हरपतो कारण कथेमध्ये वास्तव टिपलेले आहे.काही कथांमध्ये कथानायकाच्या भावनांचा उद्रेक पहावयास मिळतो.कथानायकाची भाषा टोकदार बनताना दिसते.प्रसंगानुरूप तो भावनोद्रेकामुळे शिव्या हासडतो.आपल्यातील घुसमट बेधडकपणे व्यक्त करतो.
        एकंदरीत या कथासंग्रहाच्या माध्यमातून लेखक वर्तमानातील व्यवस्थेचे वास्तव उलगडून दाखविण्यात सफल होतात.सरदार जाधव यांनी तयार केलेले मुखप्रुष्ट कथासंग्रहाला साजेसं असं आहे.

-प्रा.शौकत आतार


पुस्तकाचे नाव: पीळ आणि इतर कथा (कथासंग्रह)
लेखक: डॉ.रवींद्र ठाकूर
प्रकाशन: पद्मगंधा प्रकाशन,पुणे.
प्रुष्टसंख्या: 144
प्रथम आव्रुती: आँक्टोबर,2016


बुधवार, नवंबर 08, 2017

पुस्तक परिचय 


                डॉ.अभय बंग यांनी वयाच्या 44 व्या वर्षी -हदयरोग झाल्यावर आपल्या अनुभवावर आधारित 'माझा साक्षात्कारी -हदयरोग'हे पुस्तक लिहीले.राजहंस प्रकाशन,पुणे द्वारे ते जानेवारी 2000 मध्ये प्रकाशित झाले. पुस्तकात डॉ.बंग यांनी त्यांना झालेल्या -हदयरोगाची कारणमीमांसा अतिशय प्रामाणिकपणे,तटस्थतेनं आणि तितक्याच वस्तुनिष्ठपणे केलेली आहे.तसेच रोग झाल्याचे समजल्यावर होणारी मानसिक,भावनिक घालमेल नेमक्या शब्दात त्यांनी व्यक्त केली आहे.सदर रोग त्यांना का झाला ? याचा त्यांनी घेतलेला शोध अत्यंत प्रशंसनीय आहे.कारण हा शोध घेण्यासाठी आपल्याच अंतर्बाह्य भूतकाळाला आपण खणावे लागते.यासाठी आपणास स्वत:वर काम करावं लागतं. त्यामध्ये ते पूर्णपणे यशस्वी ठरले आहेत.
पुस्तकात त्यांनी -हदयरोगाची अनेक कारणे सांगितली आहेत.त्यामध्ये विशेषत:
1. बैठं काम करणारी आणि व्यायामाचा अभाव असणं
2.ताणतणावात जीवन जगणं,(सतत मनात असमाधान,तगमग असणं,एकटेपणा वाढणं इ .)
3.आहारात कोलेस्टिरॉल वाढविणारे घटक अति प्रमाणात असणं
4.मधुमेह असणं
        कोलेस्टिरॉल वाढीची कारणे सांगताना डॉ.बंग म्हणतात, ' मांसाहार,लठ्ठ,बैठ्या लोकांमध्ये,ध्रूमपान करणा-यांमध्ये,मानसिक तणाव असणा-यांमध्ये,स्पर्धात्मक जीवन जगणा-यांमध्ये कोलेस्टिरॉलचे प्रमाण वाढतं.'मला वाटतं,आपण आपला दैनंदिन आहार संतुलित कसा होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.आवडतं म्हणून प्रमाणापेक्षा अधिक खाणं रोगाला निमंत्रण देणं आहे.
        मुख्यत: -हदयरोगाची सुरूवात होण्यास बैठी जीवनपध्दती म्हणजेच व्यायामाचा अभाव हा कारणीभूत आहे.यासंदर्भात ते म्हणतात, 'शारीरिक श्रम कमी झाले की शरीरपेशींचा आपल्याच शरीरातील इंन्सुलिन ह्या हार्मोनला प्रतिसाद कमी होत जातो.त्यामुले रक्तातील साखरेचे प्रमाण वाढायला लागते.म्हणजेच मधुमेह होतो.भरपाई करण्यासाठी शरीर अधिक इंन्सुलिन निर्माण करतं.शरीरात सतत इंन्सुलीन जास्त असल्यास रक्तवाहिन्या आकुंचित होतात,ब्लड प्रेशर वाढतं,कोलेस्टिरॉल वाढतं,रक्तवाहिन्यांमध्ये अथरोस्क्विलोसिस निर्माण होतो व शेवटी -हदयरोग निर्माण होतो.' म्हणजे शारीरिक श्रमाचा किंवा व्यायामाचा अभाव खूप महागात पडू शकतो.पोटाचा वाढलेला अति घेर ही -हदयरोगाची बाह्य खूण आहे.त्यांच्या मतानुसार माणसानं नुसतं बौद्धिक असता कामा नये.त्याचबरोबर भावनिकसुध्दा असावं.ज्यामुळे ताण वाढणार नाही.ताण वाढविणारं दैनंदिन रूटिन तात्काळ बदलणं आवश्यक आहे.आपल्या दैनंदिन आहारात तेलाच्या प्रमाणाविषयी ते म्हणतात,' सर्वसाधारणपणे प्रत्येक मनुष्यानं दररोज जास्तीत जास्त विविध पदार्थांच्या माध्यमातून 20 ग्रॅम तेल खाण्यात वापरण्यास हरकत नाही.'(म्हणजे महिन्यास 600 ग्रॅम)तसेच तूप,साखर,मिठाई,आईसक्रीम,तेलकट पदार्थ,दूध,मैदा,अंडी, इत्यादींचा अतिरेक टाळावा.आहारात फायबरयुक्त पदार्थ,पालेभाज्या,सलाड,मोड असलेल्या डाली,फले,भाज्यांचे सूप,काकडी,गाजर इत्यादींचे प्रमाण वाढवावे.भरपूर व्यायाम,उपयोगी काम मन लावून करणे,ध्यान,प्राणायाम,योगासन इत्यादींना आपल्या दैनंदिन जीवनात स्थान असणं आवश्यक आहे.जे लोक नियमित तीस मिनिटे जलद गतीने चालतात त्यांना आवश्यक तो व्यायामही मिळतो व -हदयरोगाचा धोका निम्म्यानं कमी होतो.
        सदर पुस्तकात प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम,आल्बर्ट एलिस , ऑर्निश, डॉ. जॉर्ज शीहन ,स्टीफन कॉव्ही आईन्स्टाईन, स्टिफन हॉकिंग,आचार्य रजनीश,जे क्रुष्णमूर्ती, कार्ल राजर्स, विनोबा भावे,अय्यंगार,महात्मा गांधी,राजेंद्र यादव,विमलाताई ठकार, ऑक्टोव्हिया,कबीर, अडम स्मिथ, वॉस्कर वाईल्ड, टॉलस्टॉय इत्यादी महामानवांचे,त्यांच्या विचारांचे संदर्भ डॉ.बंग यांनी दिल्याने त्यांच्या या पुस्तकाचे गुणात्मक मूल्य अधिक पटींनी वाढले आहे.
        एकूण 176 पानांच्या या पुस्तकाचे एकूण 7 उपविभाग आहेत-आघात,ऑर्निश,क्षणस्थ,दर्शन, स्वधर्म,शांती,आरोग्यासाठी काही उपयोगी माहिती व पध्दती इत्यादि.प्रत्येक विभागाचे आपले महत्व आहे.यातील सातव्या विभागात -हदयरोगाच्या तपासण्या,तुमचा आहार-किती आरोग्यदायी,आहारातील प्रमुख अन्नघटक, फॅटस,व्यायाम,फायबर,चालणे इत्यादींची शास्त्रीय माहिती आहे.काही परीक्षा आहेत.प्रश्न आहेत ज्याची उत्तरे आपण दिल्यावर आपल्या आरोग्याविषयी आपणास समजते.
-हदयरोगाची कारणे,परिणाम तसेच उपाय यांची इत्यंभूत शास्त्रशुध्द माहिती असणारा हा उपयोगी ग्रंथ आजच्या 21 व्या शतकातील जीवन जगणा-या प्रत्येकाने वाचायलाच हवा.किंबहुना त्यातील आपल्या जीवनास आवश्यक गोष्टी अंमलात आणून स्वस्थ राहायला हवे.
प्रा.शौकत आतार


पुस्तकाचे नांव: 'माझा साक्षात्कारी -हदयरोग'
लेखक: डॉ.अभय बंग
प्रकाशन: राजहंस प्रकाशन,पुणे
प्रथमाव्रुत्ती: 2000
प्रुष्ठसंख्या: 176
मूल्य: 140 रूपये


चित्रपट  परिचय :"Rebellious Flower"

        "Rebellious Flower" नामक शीर्षक असणारा ओशो उर्फ आचार्य रजनीश यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहिला.चित्रपटाचे क्रिशन हुडा हे Director आहेत.तर Producer आणि लेखक जगदीश भारती आहेत.यामध्ये प्रामुख्याने ओशो कसे घडत गेले याची ही कहाणी आहे.अगदी बालपणापासून ओशोंची जिज्ञासु व्रुत्ती,त्यांना वारंवार पडणारे प्रश्न,त्यांची उत्तरं मिळविण्यासाठीची धडपड,आजी-आजोबांचे संस्कार,त्यांची निर्भीडता,त्यांचं वाचनवेड,निसर्गात हरवून जाणं इत्यादी अशा ब-याच गोष्टी आपणास चित्रपटातून कळतात.ज्यांना ओशोंचं बालपण,त्यांच्यावर झालेले संस्कार,त्यातून त्यांचं घडत जाणारं व्यक्तीमत्व समजून घ्यायची इच्छा आहे.अशांनी नक्की हा सिनेमा पहावा. तसेच ज्यांना ओशोंचे विचार आवडतात.ज्यांनी ओशोंच्या पुस्तकांचं वाचन केलय,आँडियो,व्हिडीओ रूपातील त्यांची लेक्चर ऐकलीत त्यांनी तर वेळ काढून सिनेमा पहावा.
        मला वाटतं,कोणत्याही व्यक्तीला समजून घ्यायला त्याचा वर्तमान माहित असून चालत नाही तर त्याचबरोबर त्याचा भूतकाळ,त्यातील त्याची जडणघडण समजून घेणंही तितकच महत्वाचे ठरते.म्हणजे झाडाची फळे,फुले, फांद्या,बुंधा बघण्याबरोबर त्याच्या मुळालाही तपासणं तितकचं किंबहुना त्याही पेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.असो.
        दुसरं महत्वाचे म्हणजे आपण बालकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो का?दिली तर कशी देतो?त्यानं त्या बालकाला प्रश्नाचं उत्तर मिळतं का? दिलेलं उत्तर कशावर आधारित असतं? म्हणजे आपण ऐकलेल्या माहितीवर की अनुभवावर? बालकाच्या प्रश्नाला आपण किती गांभीर्याने घेतो? त्यावर कधी विचार करतो का? त्या प्रश्नांच्या उत्तरावर त्याची वैचारिक जडणघडण अवलंबून असते याचा विचार करतो का? असे असंख्य प्रश्न तयार होतात.मला वाटतं,या द्रुष्टीने या चित्रपटाचे महत्व अनन्यसाधारण आहे.आपण पाहतो,आपल्या आसपास अनेक बालकांवर संस्कारक्षम वयात त्याच्या मनाच्या को-या पाटीवर आपण काय गिरवितोय.आणि ही गिरविण्याची सुरुवात सर्वप्रथम घरातून होते.नंतर समाजातून.त्यामुळे आई-वडिलांची ,घरच्या सदस्यांची बालकाच्या विकासातील भूमिका या द्रुष्टीने खूप आणि खूप महत्वाची आहे.आज आपण आपल्या लहानशा निरागस बालकाच्या जिज्ञासेला,प्रश्नांना दिलेली उत्तरं त्याच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारी असतात.त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना ,त्यांच्या प्रश्नांना समजून घेऊन त्याची योग्य उत्तरं देणं अतिशय महत्वाचे आहे असे वाटते.
        सदर चित्रपटामध्ये लहानशा राजूला आजोबा सांगत की, "आपल्यावर झालेला अन्याय सहन करायचा नाही.नेहमी सत्याची कास धरायची." त्याप्रमाणे तो लहानगा आपल्यावर आन्याय झाला की दाद मागत राहतो.एकंदरीत ओशोंच्या जडणघडणीवर आधारीत हा सिनेमा ओशोंविषयी ,त्यांच्या बालपण,युवावस्थेविषयी असणारं कुतूहल,जिज्ञासा नक्की शमवितो यात तिळमात्र शंका नाही.

-प्रा.शौकत आतार



























कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा