पवित्र प्रेमाचा उत्कट आविष्कार : ‘पौर्णिमा’
तीन तपाएवढा काळ जिच्यावर मनापासून
प्रेम केले, संसार केला त्या प्राणप्रिय प्रेयसी
तथा पत्नीचे आकस्मिक निधन पतीच्या वाढदिवसादिनी होते. नियतीने केलेल्या या क्रूर
चेष्टने पती दु:खसागरात बुडून जातो. तडफडतो. पत्नीची पोकळी असह्य वेदना देते. मग तो त्यातून स्वत:ला सावरत आपल्या
पत्नीप्रती असणार्या अतीव प्रेमापोटी वेळोवेळी तिच्यावर केलेल्या कविता एकत्र
करण्याचा संकल्प करतो आणि कवितासंग्रह प्रकाशित करून तिला अर्पित करतो .त्या कवितासंग्रहाचे
नाव ‘पौर्णिमा’. प्रा.दिलीपकुमार मोहिते यांचा हा काव्यसंग्रह परिसस्पर्श पब्लिकेशन, टाळगाव (कराड) ने अलीकडेच प्रकाशित
केला आहे. यामध्ये एकूण 57 कविता आहेत. प्रेमाने तुडुंब
भरलेल्या या प्रेमकवितेच्या केंद्रस्थानी प्रेयसी
तथा पत्नी आहे. तिच्याविषयी असणार्या
प्रेमाच्या आठवणी कवी आपल्या कवितेतून अभिव्यक्त करतो आणि समाजापर्यंत पोहचवितो. कवी आपल्या भूतकाळात जातो. आपल्या प्रेमाच्या सुरुवातीच्या मंथरलेल्या
दिवसातील आठवणी त्याला येत राहतात.
सखीचा जीवनात प्रवेश झाला आणि कवी स्वत:ला
विसरला त्यामुळे त्याचे जीवन गाणे अधिक मधुर झाले असे तो म्हणतो. कवीच्या -हदयात सदैव
प्रेयसीच्या प्रीतीचा नंदादीप तेवतो आहे. प्रेमाने आप्लावीत होऊन प्रेमी
प्रेयसीच्या प्रेमाने चिंब होतो, भिजून जातो -
‘त्या सुखाच्या हिरव्या
रानी
मधुर स्वरांनी गायली गाणी
कारंज्यास्तव प्रेम आपुले
धुंदपणाने बरसत होते ’
‘कधीतरी फिरून तुझी भेट व्हायची,या रित्या आयुष्यात थेट
रंगत यायची’ म्हणत
प्रेमी
आपल्या प्रेमिकेच्या होकाराची वाट बघत असतो ‘तुझ्या होकारातच सखे
न्हावून गेलो ’असे म्हणत तुझ्या होकारामुळे मी आता माझा राहिलो नाही कारण
‘आज सखे मी बहरून गेलो
तुझ्या शब्द कळ्यांनी
फुलून गेलो’
‘शुभ्र वेड्या चंद्राला,चांदण्याचा साज आहे,या भाववेड्या जगण्याला,तुझ्या प्रेमाचा ताज आहे’ असे म्हणत कवी शतजन्मी मजसाठी जगताना प्रेयसीला पाहण्याची, प्रीतफुलांना प्राणा
पलीकडे जपण्याची इच्छा व्यक्त करतो. प्रेयसी गृहलक्ष्मी बनून येते तेव्हा तो
आनंदानं न्हाऊन निघतो. आणि दिन गोड साजरा करतो ‘तुझी पवित्र संगत,शत जन्मांची सोबत व्हावी’ अशी अभिलाषा मनात बाळगत कवीला आपली पौर्णिमा ‘प्रीत चांदणे मनी सजविणारी चांदवेडी वाटते. तसेच कवीला आपला गांव, गांवाकडची माती, माणसं, शिवार, पाऊस, इत्यादी विषयी कमालीचा आपलेपणा, जिव्हाळा कवितांमधून
प्रकट होतो. ‘ मायबाप घालती मजला मायेची पाखर,पाषाण हदयालाही फुटती
पाझर’ म्हणत आई-वडिलांविषयी
कृतज्ञता व्यक्त करतो.
कवीमध्ये सकारात्मकता ठासून भरली असून त्याच्या पाठीशी कटू
गोड अनुभव आहेत. माणसाच्या जीवनात सुख दु:खाचे क्षण येत असतात. सुखामुळे हुरळून जायचं
नाही आणि दु:खाने मोडून पडायचं नाही हा संदेश कवी देतो. ‘सोसले ऊन किती कुणा न सांगायचे,लाख जखमांना विसरून जायचे, जगताना दुसर्यासाठी
सुखात न्हायचे’ असा म्हणत हिरव्या स्वप्नांसाठी चालत रहाण्याचा संदेश देतो -
‘पायी टोचले काटे किती
रक्त न पहायचे
हिरव्या स्वप्नांसाठी
चालत रहायचे
सोशीत आघात सारे पुढे
जायचे’
‘प्रीतीची गाणी, गाऊया राणी’ म्हणणारा कवी प्रियेच्या
प्रेमळ सहवासाला, अविश्रांत परिश्रमाला, संयम आणि त्यागाला सलाम करतो. एकेकाळी विरहात व्याकुळ झालेला प्रियकर विरहदग्ध
अवस्थेत भावना शब्दबद्ध करतो -
‘चिंब ओल्या पापण्यात
चांदणी ही रात आहे
विरहाच्या क्षणांची
भैरवी मी गात आहे’
जिने
शब्दांच्या झुल्याभोवती कसरत करायची सवय
कवीला लावली .काव्य लेखनास प्रेरणा दिली. त्या कवीच्या अर्धांगींनीला नियती जेव्हा
हिरावून नेते तेव्हा तो तगमगतो -
‘आता तू मात्र
झूल्याची साथ सोडून गेलीस
स्वप्नांचे झोके एकटाच
घेतोय
कधीतरी तू येशील या आशेने’
लेखनास
प्रोत्साहन देणारी पत्नी सोडून गेल्यावर जो दु:खाचा डोंगर कोसळतो त्या दु:खाला कवटाळून
न राहता तो आपल्या पत्नीला काव्य संग्रहाच्या प्रारंभी लिहलेल्या डोळ्यातून पाणी
आणणार्या पत्रात म्हणतो,
‘सरकार, आता स्वत:ला सावरतोय आपल्या पिलांसाठी, नातवंडांसाठी, कुटुंबियांसाठी, मित्रांसाठी, समाजासाठी स्वत:ला वाहून घेणार आहे’ हा आशावाद व्यक्त करतो. त्यांच्या अंगी असणारी नम्रता, थोरमोठ्यांचे आशीर्वाद
घेण्याचे, आदर देण्याचे संस्कार बरेच काही शिकवून जातात. तसेच साहित्यिक, शैक्षणिक, सामजिक क्षेत्रातील
लोकांचा लवाजमा असलेल्या प्रा.मोहिते यांच्या आई, वडील, भाऊ, बहीण इत्यादी सर्वांच्या
प्रती असलेल कृतज्ञतेचे भाव मनोगतातून व्यक्त होतात. प्रस्तावनेत प्राचार्य सुहास साळुंखे यांनी
प्रा. मोहिते यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा धांडोळा घेतला आहे
तसेच त्यांच्या कवितांची आशयघन समीक्षा केली आहे. तर गझलकार अनंत राऊत यांनी मोजक्याच
पण नेमक्या शब्दात ब्लर्ब लिहीला आहे जो वाचकांना काव्यसंग्रह वाचनाची उत्सुकता
वाढवितो. माणूसपण हरवत चाललेल्या व नितीमूल्यांच्या घसरणीच्या या काळात अशी कवी
मनाची संवेदनशील माणसं आणि त्यांच्या कविता वाचल्या की वाचक भरून पावतो. या कविता गहिर्या
पवित्र प्रेमाचे गीत गातात पण त्याचबरोबर
जीवन प्रवासात निष्ठेने साथ देणार्या अर्धांगिणीविषयी असणार्या अतीव पती प्रेमाची
ही साक्ष देतात...!
-प्रा. एस.के. आतार
आर्टस अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे
मोबाईल-८८०६५२७७५८
Email-shaukatatar@gmail.com
पुस्तकाचे नांव : पौर्णिमा (कवितासंग्रह)
लेखक : प्रा. दिलीपकुमार मोहिते
प्रकाशक: परिसस्पर्श पब्लिकेशन टाळगाव(कराड)
पॄष्ठे : 120
किंमत:150 रू
.png)