साहित्य सौरभ
इस ब्लॉग के माध्यम से मैं अपनी विभिन्न गतिविधियों की जानकारी देने का प्रयास कर रहा हूँ ।
शनिवार, ३० नोव्हेंबर, २०२४
शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३
बुधवार, १ जून, २०२२
पवित्र प्रेमाचा उत्कट आविष्कार : ‘पौर्णिमा’
तीन तपाएवढा काळ जिच्यावर मनापासून
प्रेम केले, संसार केला त्या प्राणप्रिय प्रेयसी
तथा पत्नीचे आकस्मिक निधन पतीच्या वाढदिवसादिनी होते. नियतीने केलेल्या या क्रूर
चेष्टने पती दु:खसागरात बुडून जातो. तडफडतो. पत्नीची पोकळी असह्य वेदना देते. मग तो त्यातून स्वत:ला सावरत आपल्या
पत्नीप्रती असणार्या अतीव प्रेमापोटी वेळोवेळी तिच्यावर केलेल्या कविता एकत्र
करण्याचा संकल्प करतो आणि कवितासंग्रह प्रकाशित करून तिला अर्पित करतो .त्या कवितासंग्रहाचे
नाव ‘पौर्णिमा’. प्रा.दिलीपकुमार मोहिते यांचा हा काव्यसंग्रह परिसस्पर्श पब्लिकेशन, टाळगाव (कराड) ने अलीकडेच प्रकाशित
केला आहे. यामध्ये एकूण 57 कविता आहेत. प्रेमाने तुडुंब
भरलेल्या या प्रेमकवितेच्या केंद्रस्थानी प्रेयसी
तथा पत्नी आहे. तिच्याविषयी असणार्या
प्रेमाच्या आठवणी कवी आपल्या कवितेतून अभिव्यक्त करतो आणि समाजापर्यंत पोहचवितो. कवी आपल्या भूतकाळात जातो. आपल्या प्रेमाच्या सुरुवातीच्या मंथरलेल्या
दिवसातील आठवणी त्याला येत राहतात.
सखीचा जीवनात प्रवेश झाला आणि कवी स्वत:ला
विसरला त्यामुळे त्याचे जीवन गाणे अधिक मधुर झाले असे तो म्हणतो. कवीच्या -हदयात सदैव
प्रेयसीच्या प्रीतीचा नंदादीप तेवतो आहे. प्रेमाने आप्लावीत होऊन प्रेमी
प्रेयसीच्या प्रेमाने चिंब होतो, भिजून जातो -
‘त्या सुखाच्या हिरव्या
रानी
मधुर स्वरांनी गायली गाणी
कारंज्यास्तव प्रेम आपुले
धुंदपणाने बरसत होते ’
‘कधीतरी फिरून तुझी भेट व्हायची,या रित्या आयुष्यात थेट
रंगत यायची’ म्हणत
प्रेमी
आपल्या प्रेमिकेच्या होकाराची वाट बघत असतो ‘तुझ्या होकारातच सखे
न्हावून गेलो ’असे म्हणत तुझ्या होकारामुळे मी आता माझा राहिलो नाही कारण
‘आज सखे मी बहरून गेलो
तुझ्या शब्द कळ्यांनी
फुलून गेलो’
‘शुभ्र वेड्या चंद्राला,चांदण्याचा साज आहे,या भाववेड्या जगण्याला,तुझ्या प्रेमाचा ताज आहे’ असे म्हणत कवी शतजन्मी मजसाठी जगताना प्रेयसीला पाहण्याची, प्रीतफुलांना प्राणा
पलीकडे जपण्याची इच्छा व्यक्त करतो. प्रेयसी गृहलक्ष्मी बनून येते तेव्हा तो
आनंदानं न्हाऊन निघतो. आणि दिन गोड साजरा करतो ‘तुझी पवित्र संगत,शत जन्मांची सोबत व्हावी’ अशी अभिलाषा मनात बाळगत कवीला आपली पौर्णिमा ‘प्रीत चांदणे मनी सजविणारी चांदवेडी वाटते. तसेच कवीला आपला गांव, गांवाकडची माती, माणसं, शिवार, पाऊस, इत्यादी विषयी कमालीचा आपलेपणा, जिव्हाळा कवितांमधून
प्रकट होतो. ‘ मायबाप घालती मजला मायेची पाखर,पाषाण हदयालाही फुटती
पाझर’ म्हणत आई-वडिलांविषयी
कृतज्ञता व्यक्त करतो.
कवीमध्ये सकारात्मकता ठासून भरली असून त्याच्या पाठीशी कटू
गोड अनुभव आहेत. माणसाच्या जीवनात सुख दु:खाचे क्षण येत असतात. सुखामुळे हुरळून जायचं
नाही आणि दु:खाने मोडून पडायचं नाही हा संदेश कवी देतो. ‘सोसले ऊन किती कुणा न सांगायचे,लाख जखमांना विसरून जायचे, जगताना दुसर्यासाठी
सुखात न्हायचे’ असा म्हणत हिरव्या स्वप्नांसाठी चालत रहाण्याचा संदेश देतो -
‘पायी टोचले काटे किती
रक्त न पहायचे
हिरव्या स्वप्नांसाठी
चालत रहायचे
सोशीत आघात सारे पुढे
जायचे’
‘प्रीतीची गाणी, गाऊया राणी’ म्हणणारा कवी प्रियेच्या
प्रेमळ सहवासाला, अविश्रांत परिश्रमाला, संयम आणि त्यागाला सलाम करतो. एकेकाळी विरहात व्याकुळ झालेला प्रियकर विरहदग्ध
अवस्थेत भावना शब्दबद्ध करतो -
‘चिंब ओल्या पापण्यात
चांदणी ही रात आहे
विरहाच्या क्षणांची
भैरवी मी गात आहे’
जिने
शब्दांच्या झुल्याभोवती कसरत करायची सवय
कवीला लावली .काव्य लेखनास प्रेरणा दिली. त्या कवीच्या अर्धांगींनीला नियती जेव्हा
हिरावून नेते तेव्हा तो तगमगतो -
‘आता तू मात्र
झूल्याची साथ सोडून गेलीस
स्वप्नांचे झोके एकटाच
घेतोय
कधीतरी तू येशील या आशेने’
लेखनास
प्रोत्साहन देणारी पत्नी सोडून गेल्यावर जो दु:खाचा डोंगर कोसळतो त्या दु:खाला कवटाळून
न राहता तो आपल्या पत्नीला काव्य संग्रहाच्या प्रारंभी लिहलेल्या डोळ्यातून पाणी
आणणार्या पत्रात म्हणतो,
‘सरकार, आता स्वत:ला सावरतोय आपल्या पिलांसाठी, नातवंडांसाठी, कुटुंबियांसाठी, मित्रांसाठी, समाजासाठी स्वत:ला वाहून घेणार आहे’ हा आशावाद व्यक्त करतो. त्यांच्या अंगी असणारी नम्रता, थोरमोठ्यांचे आशीर्वाद
घेण्याचे, आदर देण्याचे संस्कार बरेच काही शिकवून जातात. तसेच साहित्यिक, शैक्षणिक, सामजिक क्षेत्रातील
लोकांचा लवाजमा असलेल्या प्रा.मोहिते यांच्या आई, वडील, भाऊ, बहीण इत्यादी सर्वांच्या
प्रती असलेल कृतज्ञतेचे भाव मनोगतातून व्यक्त होतात. प्रस्तावनेत प्राचार्य सुहास साळुंखे यांनी
प्रा. मोहिते यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा धांडोळा घेतला आहे
तसेच त्यांच्या कवितांची आशयघन समीक्षा केली आहे. तर गझलकार अनंत राऊत यांनी मोजक्याच
पण नेमक्या शब्दात ब्लर्ब लिहीला आहे जो वाचकांना काव्यसंग्रह वाचनाची उत्सुकता
वाढवितो. माणूसपण हरवत चाललेल्या व नितीमूल्यांच्या घसरणीच्या या काळात अशी कवी
मनाची संवेदनशील माणसं आणि त्यांच्या कविता वाचल्या की वाचक भरून पावतो. या कविता गहिर्या
पवित्र प्रेमाचे गीत गातात पण त्याचबरोबर
जीवन प्रवासात निष्ठेने साथ देणार्या अर्धांगिणीविषयी असणार्या अतीव पती प्रेमाची
ही साक्ष देतात...!
-प्रा. एस.के. आतार
आर्टस अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे
मोबाईल-८८०६५२७७५८
Email-shaukatatar@gmail.com
पुस्तकाचे नांव : पौर्णिमा (कवितासंग्रह)
लेखक : प्रा. दिलीपकुमार मोहिते
प्रकाशक: परिसस्पर्श पब्लिकेशन टाळगाव(कराड)
पॄष्ठे : 120
किंमत:150 रू
शनिवार, १० एप्रिल, २०२१
संवेदनशील मनाचा संयत आविष्कार : ऋतुरंग
संवेदनशील मनाचा संयत आविष्कार : ऋतुरंग
डॉ.बी.एम.हिर्डेकर यांचा ‘ऋतुरंग’ नामक कवितासंग्रह अलीकडेच भाग्यश्री प्रकाशन ने प्रकाशित केला आहे. डॉ.हिर्डेकर
यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षे प्राध्यापक, प्रशासक म्हणून भरीव काम केलेले आहे, करत आहेत. त्यांनी आपल्या
कवितांमध्ये बळीराजा, मजूर, कष्टकरी,महिला,उसतोड कामगार,सामान्य जनता इत्यादींचे
प्रश्न, दु:ख, व्यथा, वेदनांना अभिव्यक्त केले आहे.त्यांचे गेल्या चार-पाच दशकातील
जीवनानुभव आपणास त्यांच्या या कवितांमधून कलात्मक पद्धतीने शब्दबद्ध झालेले दिसून
येतात.जीवन जगत असताना कवी आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्या-वाईट विविध प्रसंगातून,अनुभवातून जात असतो. संवेदनशीलतेमुळे तो आपल्याबरोबर इतरांच्या
सुख-दुःखात सामील होत असतो. कर्जबाजारीपणामुळे बळीराजाच्या नशिबी आलेले दु:ख, सरकारची
चुकीची धोरणे व फुसक्या घोषणा त्यांच्या कवितेतून व्यक्त होतात. आपण पाहतो की बळीराजाला
अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अवकाळी पाऊस, दुष्काळ, त्याचबरोबर कर्जापायी झालेली त्याची झालेली दयनीय परिस्थिती ‘नव्या जुन्याचा खेळ बाबा’ ही कविता अधोरेखित करते.
‘नव्याजुन्यात बळीराजा
अडकलेला
सरकार, पाऊस, वीजवाला, अडतवाला
सरकारी घोषणांचा फक्त
गाजावाजा
सारेच वाजिवत्यात त्याचा
बेंडबाजा’
याबरोबरच अवकाळी पाऊस बळीराजाचे कसे जीवघेणं
नुकसान करतो हे ‘पाऊस असा’ या कवितेत स्पष्ट झाले आहे. डॉ.हिर्डेकर यांच्या
कवितांमध्ये शेतकऱ्यांच्या वेदनांना अभिव्यक्त केलेले दिसून येते.‘कष्टाचा भाव’ ही
एक लघु कविता आहे पण अतिशय मार्मिक आहे.‘काम आमचे दाम तुमचे’ कविता कष्टकरी, मजूर वर्गाच्या व्यथांचे, वेदनेचे आतड्याला पिळवटून टाकणारे चित्रण करते.‘कारागीर वाऱ्यावर’ ही कविता कामगार, कारागीरांची
कोरोनामुळे झालेली दयनीय स्थिती, सरकारची चुकीची धोरणे,नीती यावर कडाडून टीका करते.‘मोल माझ्या श्रमाचे मातीमोल ठरवू नका’ अशी कळकळीची विनंती करते.‘तू फक्त नाच’ ही कविता आजचे शिक्षण वास्तव अधोरेखित करते-
‘शिकणारे मुजोर , शिकविणारे कमजोर
नेमणारे चोर ,
वरिष्ठ कामचोर
हाताखालचे चोरावर मोर , तरी म्हणत्यात नाच रे मोरा नाच’
महिलांवर पिढ्यानपिढ्या होणारे अन्याय, अत्याचार
तसेच तिला उपेक्षित, दुर्लक्षित ठेवणे, दुय्यम स्थान देणे हे समाजवास्तव ‘रामाच्या राज्यात’ नावाची कविता व्यक्त करते. मग कवी प्रश्न करतात की ‘रामाच्या
राज्यात सीता का हो वनवासी?’ ‘चेहरे’ कविता चेहऱ्यामागचे ‘चेहरे’
उजेडात आणते. निर्दयी मुलाच्या संवेदनाहीनतेमुळे मायबापाच्या दयनीय
अवस्थेचे चित्रण ‘पुत्र व्हावे ऐसे उफराटे, काळीज हे फाटल फाटे’ हे आजचे वास्तव ‘माय बाप झाले दीन’ कविता व्यक्त करते.‘पाणी, वाणी, नाणी शहरात
सगळच लागलय नासायला’ म्हणत ‘या
शहरांचं काय करायचं?’ ही कविता शहरातील प्रश्न चव्हाट्यावर आणते.‘पक्षांनीही
घेतले मोकळे श्वास’म्हणत कोरोनामुळे लॉकडाऊन मुळे प्रदूषण, गोंगाट, अतिरेक कमी झाला‘अतिरेकाचा अंत’ ही कविता व्यक्त करते.जाती-धर्माच्या
भिंती छेदून निव्वळ माणूस म्हणून जगता आले पाहिजे. ‘जगता येते आनंदाने’ ही माणूसपणाची जाणीव करून
देणारी कविता दिशा देते मानवताधर्म शिकवते ‘वसुधैव कुटुम्बकम’ शिकवते. व्यापक
उदात्त दृष्टिकोन देते. कवी म्हणतात-
‘जगता येते सोडून जात पात,
करता येते कर्म सोडून
आपला धर्म’
‘बॉडी’
कविता मानवी जीवनाची
क्षणभंगुरता, नश्वरता, अहंकार
अधोरेखित करते. प्रतिमांमध्ये जगता कामा नये पद. पैसा यांची क्षणभंगुरता अधोरेखित
करते. शेवटी कवी म्हणतात ,‘आम्ही माणूस कधी झालोच
नाही’.आज सर्वकाही ऑनलाइन झाले आहे. आभासी जगात
वावरणार्या या दुनियेत खरी नाती उरलीच नाहीत. ही सल कवी आभासी जग’ या कवितेत व्यक्त करतात-
‘आभासी जगात, नभाची नाते उरलेच नाही
नुसतेच पळणे ,
घामाने गळणे राहिलेच नाही’
यातील अनेक कवितांचा सूर मानवतावादी आहे.
माणुसकीचा आहे.कवी मानवता धर्म आपल्या कवितेतून व्यक्त करतात.‘माणुसकीचा झरा’ या कवितेत ते म्हणतात ‘मानवता हा एक धर्म खरा, माणुसकीचा निर्मळ वाहू दे झरा’. ‘करुणेचा झरा’या कवितेत कवी आपल्या आई विषयीच्या भावना व्यक्त करतात.तिच्या वाटी आलेलं दुःख,
व्यथा-वेदनामुळे कवीचे मन कासाविस होतं. तिच्या वाट्याला आलेले भोग, दुःख यांनी
कवीच्या मनात प्रश्न पडतात-
‘ मनोभावे निरपेक्ष देवपुजा तिने केली
तरी सजा कपाळी तिच्या कोणी लिहिली?’
एकूणच‘ऋतुरंग’ मधील कविता आपणास अंतर्मुख करतात. त्याचबरोबर जीवन जगण्यासाठी दिशा
देतात. समृद्ध करून जातात. सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक इत्यादी विविध क्षेत्रातील
प्रश्नांचा, समस्यांचा विस्तृत आशय असलेलेया या कवितांमध्ये भावगर्भता, विचारगर्भता
दिसून येते. साध्या, सहज, सरळ शब्दात पण मनाचा वेध
घेणारी कवीची शैली वाचकाला विचार प्रवृत्त करते. माणसाला माणूसपणाची जाणीव करून
देते. एकूण 107 कविता या काव्यसंग्रहात समाविष्ट
आहेत. त्या श्रमिकहो, समाजभान, ‘ती’ च्या शक्तीचा जागर, सृजन, शिक्षण, करुणेचा झरा, जिव्हाळा अशा विविध भागात विभागल्या गेल्या आहेत. प्रत्येक
भागाच्या प्रारंभी महान व्यक्तींच्या काही ओळी आहेत व त्याचबरोबर चित्रे (स्केचेस)
आहेत.डॉ रणधीर शिंदे यांनी आशयघन ब्लर्ब लिहिला आहे तरडॉ.रघुनाथ कडाकणे यांनीडॉ हिर्डेकर यांच्या व्यक्तिमत्वाचा
आणि कवितांचे विवेचन व विश्लेषण करणारी प्रस्तावना लिहिली आहे.आकर्षक आणि बोलके मुखपृष्ठ
विजय टिपुगडे यांनी रेखाटले आहे.सदर काव्यसंग्रह मराठी साहित्य वैभवात
मोलाची भर घालणारा आहे हे मात्र निश्चित .....!
पुस्तकाचे नांव : ऋतुरंग (कवितासंग्रह)
लेखक :डॉ.बी एम हिर्डेकर
प्रकाशक: भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर
पॄष्ठे : 152
किंमत:150 रू
शुक्रवार, २६ मार्च, २०२१
जीवनाला दिशा देणारे ‘भवन’
जीवनाला दिशा देणारे ‘भवन’
सन्
2002 ला शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागात एम.ए. साठी प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थिती
अत्यंत हालाखीची असल्यामुळे डॉ. आप्पासाहेब
पवार विद्यार्थी भवन-’कमवा व शिका’ योजनेमध्ये
प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज केला.मग मुलाखत झाली.प्रवेश मिळाला. विशेषत: कोल्हापूर,
सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात आलेली व हालाखीची
आर्थिक परिस्थिती असलेल्या मुलांनी भवनाला प्रवेश घेतला होता. वेगवेगळ्या जिल्ह्यातून,
महाविद्यालयातून आलेल्या आम्हा मुलांची भवनमुळे राहण्या-खाण्याची चांगली सोय झाली.
परीक्षा फी व इतरही सुविधा मिळत राहिल्या.भवनमध्ये आम्हाला दररोज तीन तास काम असायचे.
त्यामध्ये मेसमध्ये वाढपी,मैनेजर म्हणून, ग्रंथालयात पुस्तके इस्यू करणे तसेच पिठाची
गिरणी चालविणे, झेरॉक्स मशीन चालविणे इ.कामे भवन मध्ये आम्हाला करावी लागत. हळू-हळू
आम्ही मुले जिवाभावाने राहू लागलो. आमच्यात अतूट असे नाते तयार झाले. बघता-बघता आमच्यात
मैत्रीभाव वाढत गेला. एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. आम्ही 'भवनबंधु' कधी झालो
हे कळले देखील नाही. भवनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना अनेक अनुभव आले व ते भविष्यासाठी
उपयोगी पडले. विशेषत: झेरॉक्स सेंटर मध्ये, ग्रंथालयमध्ये, मेसमध्ये काम करताना विविध
विद्यार्थ्यांशी, लोकांशी ओळखी झाल्या. संवाद कौशल्य वृद्धिंगत झाले. आर्थिक व्यवहार
सांभाळता यायला लागले, स्वभाव संयमी झाला. परिश्रमाचे महत्व समजू लागले. स्वभावातला
संकोच कमी व्हायला लागला. व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत झाली. जबाबदारीची जाणीव निर्माण
झाली. तसेच भवनमध्ये इतर सिनियर,समवयस्क मित्र स्पर्धा परीक्षा, सेट-नेट, बँकिंग, सी.ए.
इ.चा अथकपणे बारा-बारा,चौदा-चौदा तास अभ्यास करणारे मित्र लाभले. त्यांच्याकडून प्रेरणा
मिळत राहिली. आपणही ‘काहीतरी करायला हवे’ असे वाटू लागले. महाविद्यालयामध्ये भरकटलो
होतो त्याला एक स्थिरता प्राप्त झाली. जीवनाचे ध्येय निश्चित झाले. अभ्यासासाठा 18
तास विद्यापीठाचे ग्रंथालय उपलब्ध झाले. त्याचबरोबर पुस्तक वाचनाची गोडी लागली. विविध
विषयावरची पुस्तक वाचू लागलो. आत्मचरित्र, कादंबरी प्रेरणादायी पुस्तके वाचू लागलो.
डायरी लेखन करू लागलो. चांगल्या सवयी लागत गेल्या. वेळ सार्थकी लागू लागला. जीवनाला
दिशा मिळत गेली. विभागातील तसेच प्रशासकीय कार्यालयातील ज्येष्ठांच्या अनुभवाचा फायदा
होत गेला. स्वावलंबी शिक्षणातून आत्मविश्वास येत गेला. दिवसेंदिवस तो वृद्धिंगत होत
राहिला.
विद्यापीठातील इतर विभागातील अनेक मित्र मिळाले.
त्यांच्याशी विचारांची देवाण-घेवाण होत राहिली. त्याचा फायदा होत गेला.त्यातून दिशा
मिळत राहिली. भवनच्या सिनियर विद्यार्थ्यांचा दबाव रहायचा पण तरीसुद्धा त्यांच्याकडून
ही भरपूर शिकायला मिळाले. प्रेरणा मिळाली. समवयस्क, समविचारी,समध्येयी मित्रांचे ग्रुप
तयार झाले. अभ्यासाला दिशा मिळत गेली. अभ्यासात सातत्य राहू लागले. वेळेचा सदुपयोग
होत होता. दिवसभरचे रुटीन व्यस्त होते. आम्ही विद्यार्थी तीन तास काम, विभागातील लेक्चर्स
व संध्याकाळी अभ्यास करू लागलो. नियमितपणे व्यायाम, खेळ खेळत राहिलो. त्यामुळे फिट
राहिलो. मनी स्वप्ने घेऊन आलेलो आम्ही बॅं.बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय असो की प्लेन
इमारत की भवनमधील रूम सगळीकडे नियमितपणे अभ्यास करीत राहिलो. अभ्यासाला पर्याय ठेवला
नाही. डिपार्टमेंटची लेक्चर्स करीत राहिलो, राजर्षी शाहू सभागृहात संपन्न होणारे कार्यक्रमांना
उपस्थित राहिलो, विविध क्षेत्रातील नामवंत वक्त्यांना ऐकले. समृध्द झालो. विभागात होणारी
व्याख्याने, कार्यक्रम यामुळे समद्ध होत राहिलो. विचाराना दिशा मिळत गेली. पहिल्या
वर्षी आम्हाला भवन चे रेक्टर म्हणून डॉ.व्ही.बी. ककडे सर होते. त्यांचे वेळेचे नियोजन
असेल किंवा नेमके आणि मोजकेच पण महत्वाचे बोलणे असेल. एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा
आमच्यावर खूप प्रभाव पडला. तर दुसर्या वर्षी रेक्टर डॉ. डी.टी.शिर्के सर होते. त्यांची
कामातील शिस्त असेल, आमचे प्रश्न सोडविणे असेल हे खूप प्रभावित करून गेले. त्यांच्याकडून
खूप काही शिकता आले. त्यांची काम करण्याची पद्धत जवळून बघता आली.
शिवाजी विद्यापीठात एम.ए. हिंदी विषयात प्रथम क्रमांक
प्राप्त केल्याने मला जवळ-जवळ चाळीस हजार रूपये इतकी स्कॉलरशिप मिळाली. या पैशाच्या
आधारे मी पुढे नेट-सेट च्या परीक्षा दिल्या. भवन ने दिलेला आत्मविश्वास, अविरतपणे कष्ट
करण्याची तयारी, अभ्यासातील सातत्य इत्यादीच्या जोरावर यश संपादन केले म्हणजेच ‘सेट’
ची परीक्षा मी पास झालो. दोन वर्ष तासिका तत्वावर (सी.एच.बी) नोकरी केली. पुढे महाविद्यालयात
‘सहायक प्राध्यापक’ पदावर पर्मनंट झालो. भवन ने आम्हाला आमच्या पायावर उभे केले. भवन
ने उच्च शिक्षण घेण्याची संधी दिली.आत्मविश्वास दिला, आयुष्याला दिशा, स्थिरता दिली.
स्वावलंबी शिक्षणाचे धडे दिले. संस्कार दिले. भवनमुळे ज्या सुविधा आम्हाला मिळाल्या
त्याचा आम्ही आमच्या करियरसाठी पुरेपूर वापर केला व आमचे ध्येय आम्ही साध्य केले, ज्या
भवन ने आम्हाला शिस्त दिली, जिवाभावाची माणसे दिली, सुसंस्कार दिले, आम्हाला घडविले.
आमचे प्रश्न सोडविले. आधार दिला. मायेची सावली दिली, आर्थिक प्रश्न सोडविले, पाठबळ
दिले, जगण्याची नवी प्रेरणा आणि उर्जा दिली, जगण्याचे बळ दिले. अशा भवनला सोडताना आम्हाला
दाटून आले. कारण भावनिक बंध तयार झाले होते. आपुलकीचे, जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले
होते. पण भवन सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
आज मागे वळून पाहताना वाटते की डॉ.आप्पासाहेब विद्यार्थी
भवन ने आयुष्याला कलाटणी दिली आहे. आज भवन सोडून अठरा वर्षे झालीत. मनुष्याला जीवनात
अनेक माणसे, परिस्थिती, प्रसंग समृद्ध करीत असतात. पण आमच्या जीवनात या सर्व गोष्टीबरोबरच
भवन मुळे क्रांती झाली हे मात्र निश्चित. स्वामी विवेकानंद म्हणतात की "मन,मनगट आणि मेंदूच्या संतुलित विकास शिक्षण
आहे" त्याप्रमाणे आमच्या मन, मनगट आणि मेंदूच्या विकासासाठी अनुकूल असे वातावरण
भवनने दिले.आज आमचे भवनबंधु विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाचा झेंडा अभिमानाने
मिरवित आहेत. प्रवीण अमेरिकेत शास्त्रज्ञ आहे. प्रकाश, मोहन,सचिन गोव्यात सिपला कंपनीत
चांगल्या पदावर कार्यरत आहेत. रमेश नायब तहसीलदार आहे. आनंद पी.आय. आहे. विशाल बँकेत
तर अंकुश एस टी मध्ये चांगल्या पदावर काम करत आहेत. परशुराम ‘नवोदय’ मध्ये शिक्षक म्हणून
मिरवतो आहे.शंकरगोंडा वकील आहे. अरविंद, अनिरुद्ध, शहाजी, सुखदेव, दामाजी, निलेश, विठ्ठल,
श्रीकांत, शरद, महेश, समाधान, मी विविध महाविद्यालयामध्ये सहायक प्राध्यापक म्हणून
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत आहोत. आमच्या बॅचचे आम्ही जवळजवळ ७० जण वेगवेगळ्या
क्षेत्रात काम करीत असून स्वतःच्या पायावर स्थिर झालो आहोत. या गोष्टीचे श्रेय भवनलाच
जाते.
आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येते की आपल्यावर जे श्रमाचे संस्कार झालेत
त्यामुळेच आपण काही तरी करू शकलो. माझ्यासारख्या सामान्य पण होतकरू मुलांच्या जीवनाला
आकार देण्याचे ते घडविण्याचे काम भवनने केले. कारण परिस्थितीने पिचलेल्या माझ्यासारख्या
हजारो विद्यार्थ्यांसाठी आधारवड भवन आहे. भवन दिन दलितांचा, गोर गरीबांचा कैवारी आहे.
निवारा आहे.आसरा आहे.पंढरी आहे.जीवनाला कलाटणी देणारे आहे. मी आज जो काही आहे त्याचे
श्रेय भवनला अर्पण करतो.आज आम्ही पदवीच्या मुलांना आत्मविश्वासाने अभिमानाने सांगतो
की ‘आम्ही भवनचे विद्यार्थी आहोत’. मुलंही त्यातून प्रेरणा घेतात. काहीतरी करायचे म्हणतात.त्यांच्या
चेहर्यावरती काही तरी करण्याची उर्मी दिसते.
बर वाटत. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ आपासाहेब पवार यांनी तळागळातल्या समाजाला
शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी भवन सारखा सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला त्याबद्दल
त्यांच्या चरणी मी वंदन करतो.
- प्रा.शौकत आतार
.png)

