शुक्रवार, २६ मार्च, २०२१

जीवनाला दिशा देणारे ‘भवन’

 

जीवनाला दिशा देणारे ‘भवन’

            सन् 2002 ला शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागात एम.ए. साठी प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थिती अत्यंत  हालाखीची असल्यामुळे डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन-’कमवा व  शिका’ योजनेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज केला.मग मुलाखत झाली.प्रवेश मिळाला. विशेषत: कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात आलेली व हालाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या मुलांनी भवनाला प्रवेश घेतला होता. वेगवेगळ्या जिल्ह्यातून, महाविद्यालयातून आलेल्या आम्हा मुलांची भवनमुळे राहण्या-खाण्याची चांगली सोय झाली. परीक्षा फी व इतरही सुविधा मिळत राहिल्या.भवनमध्ये आम्हाला दररोज तीन तास काम असायचे. त्यामध्ये मेसमध्ये वाढपी,मैनेजर म्हणून, ग्रंथालयात पुस्तके इस्यू करणे तसेच पिठाची गिरणी चालविणे, झेरॉक्स मशीन चालविणे इ.कामे भवन मध्ये आम्हाला करावी लागत. हळू-हळू आम्ही मुले जिवाभावाने राहू लागलो. आमच्यात अतूट असे नाते तयार झाले. बघता-बघता आमच्यात मैत्रीभाव वाढत गेला. एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. आम्ही 'भवनबंधु' कधी झालो हे कळले देखील नाही. भवनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना अनेक अनुभव आले व ते भविष्यासाठी उपयोगी पडले. विशेषत: झेरॉक्स सेंटर मध्ये, ग्रंथालयमध्ये, मेसमध्ये काम करताना विविध विद्यार्थ्यांशी, लोकांशी ओळखी झाल्या. संवाद कौशल्य वृद्धिंगत झाले. आर्थिक व्यवहार सांभाळता यायला लागले, स्वभाव संयमी झाला. परिश्रमाचे महत्व समजू लागले. स्वभावातला संकोच कमी व्हायला लागला. व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत झाली. जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. तसेच भवनमध्ये इतर सिनियर,समवयस्क मित्र स्पर्धा परीक्षा, सेट-नेट, बँकिंग, सी.ए. इ.चा अथकपणे बारा-बारा,चौदा-चौदा तास अभ्यास करणारे मित्र लाभले. त्यांच्याकडून प्रेरणा मिळत राहिली. आपणही ‘काहीतरी करायला हवे’ असे वाटू लागले. महाविद्यालयामध्ये भरकटलो होतो त्याला एक स्थिरता प्राप्त झाली. जीवनाचे ध्येय निश्चित झाले. अभ्यासासाठा 18 तास विद्यापीठाचे ग्रंथालय उपलब्ध झाले. त्याचबरोबर पुस्तक वाचनाची गोडी लागली. विविध विषयावरची पुस्तक वाचू लागलो. आत्मचरित्र, कादंबरी प्रेरणादायी पुस्तके वाचू लागलो. डायरी लेखन करू लागलो. चांगल्या सवयी लागत गेल्या. वेळ सार्थकी लागू लागला. जीवनाला दिशा मिळत गेली. विभागातील तसेच प्रशासकीय कार्यालयातील ज्येष्ठांच्या अनुभवाचा फायदा होत गेला. स्वावलंबी शिक्षणातून आत्मविश्वास येत गेला. दिवसेंदिवस तो वृद्धिंगत होत राहिला.

             विद्यापीठातील इतर विभागातील अनेक मित्र मिळाले. त्यांच्याशी विचारांची देवाण-घेवाण होत राहिली. त्याचा फायदा होत गेला.त्यातून दिशा मिळत राहिली. भवनच्या सिनियर विद्यार्थ्यांचा दबाव रहायचा पण तरीसुद्धा त्यांच्याकडून ही भरपूर शिकायला मिळाले. प्रेरणा मिळाली. समवयस्क, समविचारी,समध्येयी मित्रांचे ग्रुप तयार झाले. अभ्यासाला दिशा मिळत गेली. अभ्यासात सातत्य राहू लागले. वेळेचा सदुपयोग होत होता. दिवसभरचे रुटीन व्यस्त होते. आम्ही विद्यार्थी तीन तास काम, विभागातील लेक्चर्स व संध्याकाळी अभ्यास करू लागलो. नियमितपणे व्यायाम, खेळ खेळत राहिलो. त्यामुळे फिट राहिलो. मनी स्वप्ने घेऊन आलेलो आम्ही बॅं.बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय असो की प्लेन इमारत की भवनमधील रूम सगळीकडे नियमितपणे अभ्यास करीत राहिलो. अभ्यासाला पर्याय ठेवला नाही. डिपार्टमेंटची लेक्चर्स करीत राहिलो, राजर्षी शाहू सभागृहात संपन्न होणारे कार्यक्रमांना उपस्थित राहिलो, विविध क्षेत्रातील नामवंत वक्त्यांना ऐकले. समृध्द झालो. विभागात होणारी व्याख्याने, कार्यक्रम यामुळे समद्ध होत राहिलो. विचाराना दिशा मिळत गेली. पहिल्या वर्षी आम्हाला भवन चे रेक्टर म्हणून डॉ.व्ही.बी. ककडे सर होते. त्यांचे वेळेचे नियोजन असेल किंवा नेमके आणि मोजकेच पण महत्वाचे बोलणे असेल. एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आमच्यावर खूप प्रभाव पडला. तर दुसर्या वर्षी रेक्टर डॉ. डी.टी.शिर्के सर होते. त्यांची कामातील शिस्त असेल, आमचे प्रश्न सोडविणे असेल हे खूप प्रभावित करून गेले. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. त्यांची काम करण्याची पद्धत जवळून बघता आली.

शिवाजी विद्यापीठात एम.ए. हिंदी विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने मला जवळ-जवळ चाळीस हजार रूपये इतकी स्कॉलरशिप मिळाली. या पैशाच्या आधारे मी पुढे नेट-सेट च्या परीक्षा दिल्या. भवन ने दिलेला आत्मविश्वास, अविरतपणे कष्ट करण्याची तयारी, अभ्यासातील सातत्य इत्यादीच्या जोरावर यश संपादन केले म्हणजेच ‘सेट’ ची परीक्षा मी पास झालो. दोन वर्ष तासिका तत्वावर (सी.एच.बी) नोकरी केली. पुढे महाविद्यालयात ‘सहायक प्राध्यापक’ पदावर पर्मनंट झालो. भवन ने आम्हाला आमच्या पायावर उभे केले. भवन ने उच्च शिक्षण घेण्याची संधी दिली.आत्मविश्वास दिला, आयुष्याला दिशा, स्थिरता दिली. स्वावलंबी शिक्षणाचे धडे दिले. संस्कार दिले. भवनमुळे ज्या सुविधा आम्हाला मिळाल्या त्याचा आम्ही आमच्या करियरसाठी पुरेपूर वापर केला व आमचे ध्येय आम्ही साध्य केले, ज्या भवन ने आम्हाला शिस्त दिली, जिवाभावाची माणसे दिली, सुसंस्कार दिले, आम्हाला घडविले. आमचे प्रश्न सोडविले. आधार दिला. मायेची सावली दिली, आर्थिक प्रश्न सोडविले, पाठबळ दिले, जगण्याची नवी प्रेरणा आणि उर्जा दिली, जगण्याचे बळ दिले. अशा भवनला सोडताना आम्हाला दाटून आले. कारण भावनिक बंध तयार झाले होते. आपुलकीचे, जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. पण भवन सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

आज मागे वळून पाहताना वाटते की डॉ.आप्पासाहेब विद्यार्थी भवन ने आयुष्याला कलाटणी दिली आहे. आज भवन सोडून अठरा वर्षे झालीत. मनुष्याला जीवनात अनेक माणसे, परिस्थिती, प्रसंग समृद्ध करीत असतात. पण आमच्या जीवनात या सर्व गोष्टीबरोबरच भवन मुळे क्रांती झाली हे मात्र निश्चित. स्वामी विवेकानंद म्हणतात की  "मन,मनगट आणि मेंदूच्या संतुलित विकास शिक्षण आहे" त्याप्रमाणे आमच्या मन, मनगट आणि मेंदूच्या विकासासाठी अनुकूल असे वातावरण भवनने दिले.आज आमचे भवनबंधु विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाचा झेंडा अभिमानाने मिरवित आहेत. प्रवीण अमेरिकेत शास्त्रज्ञ आहे. प्रकाश, मोहन,सचिन गोव्यात सिपला कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहेत. रमेश नायब तहसीलदार आहे. आनंद पी.आय. आहे. विशाल बँकेत तर अंकुश एस टी मध्ये चांगल्या पदावर काम करत आहेत. परशुराम ‘नवोदय’ मध्ये शिक्षक म्हणून मिरवतो आहे.शंकरगोंडा वकील आहे. अरविंद, अनिरुद्ध, शहाजी, सुखदेव, दामाजी, निलेश, विठ्ठल, श्रीकांत, शरद, महेश, समाधान, मी विविध महाविद्यालयामध्ये सहायक प्राध्यापक म्हणून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत आहोत. आमच्या बॅचचे आम्ही जवळजवळ ७० जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असून स्वतःच्या पायावर स्थिर झालो आहोत. या गोष्टीचे श्रेय भवनलाच जाते.

आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा  लक्षात येते की आपल्यावर जे श्रमाचे संस्कार झालेत त्यामुळेच आपण काही तरी करू शकलो. माझ्यासारख्या सामान्य पण होतकरू मुलांच्या जीवनाला आकार देण्याचे ते घडविण्याचे काम भवनने केले. कारण परिस्थितीने पिचलेल्या माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांसाठी आधारवड भवन आहे. भवन दिन दलितांचा, गोर गरीबांचा कैवारी आहे. निवारा आहे.आसरा आहे.पंढरी आहे.जीवनाला कलाटणी देणारे आहे. मी आज जो काही आहे त्याचे श्रेय भवनला अर्पण करतो.आज आम्ही पदवीच्या मुलांना आत्मविश्वासाने अभिमानाने सांगतो की ‘आम्ही भवनचे विद्यार्थी आहोत’. मुलंही त्यातून प्रेरणा घेतात. काहीतरी करायचे म्हणतात.त्यांच्या चेहर्यावरती काही तरी करण्याची उर्मी  दिसते. बर वाटत. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ आपासाहेब पवार यांनी तळागळातल्या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी भवन सारखा सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांच्या चरणी मी वंदन करतो.

- प्रा.शौकत आतार


 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा