बुधवार, १३ मे, २०२०

पुस्तक परिचय


कामप्रेरणेचा सामाजिक धांडोळा : देहाचिये गुंती

माणसाच्या भूक आणि काम या आदिम स्वाभाविक प्रेरणा होत. समाजातील प्रत्येक व्यक्तीवर संस्कार, परंपरा, आसपासचे वातावरण, जीवनानुभव, वाचन, मनन . अनेक गोष्टी प्रभाव टाकतात आणि त्या अनुषंगाने त्याचे व्यक्तिमत्व घडत जात असते. त्याचबरोबर माणसाला दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळया ताण-तणावांना सामोरे जावे लागते. प्रत्येकाचे आपले वेगवेगळया स्तरावरील प्रॉब्लेम्स असतात. मग ते कौटुंबिक, सामाजिक, लैंगिक . कुठल्याही प्रकारचे असू शकतात. अशा प्रॉब्लेम्समुळे माणूस त्रस्त होत राहतो आणि सुखाला पारका होत जातो. मग मनुष्य आपल्या अशा प्रश्नांना, समस्यांना मनामध्ये घेऊन अस्वस्थतेत जगत असतो. त्यावेळी कुठल्यातरी माध्यमातून तो गुरू, बाबांच्या संपर्कात येतो. अशा गुरूंच्या प्रवचनाचे शब्द त्याच्या कानावर पडतात आणि तो तिकडे आकर्षिला जातो. आणि मग त्याला आपल्या समस्येची सोडवणूक होणार, जीवनातील दु: कमी होणार, आपण सुखी होणार अशी आशा निर्माण होते. त्यातून तो एका विशिष्ठ निष्ठेतून, श्रध्दापूर्वक अशा गुरूंचं ऐकत राहतो, त्यांचा अनुयायी बनून राहतो, त्यांच्यासाठी आपल्या आयुष्यातील काही वर्षे खर्ची घालतो पण कालांतराने जेव्हा गुरूच्या 'कथनी और करनी' मधले अंतर, त्यांच्या आश्रमातील पडद्यामागचे वास्तव, सहका-यांचे खून, कोकेनच्या ओव्हरडोसने गुरूजींचा मॄत्यू . गोष्टी त्यांच्या लक्षात येतात आणि मग पुन्हा 'आपल्याला काय मिळाले ' यांची शहनिशा मनुष्य करतो, गुरूच्या व्यक्तिमत्वाचा तटस्थपणे आलेख मांडतो. साधारणत: असा आशय असलेली कादंबरी म्हणजे डॉ.अंजली सोमण यांची 'देहाचिये गुंती'.
 कादंबरीचे प्रमुख पात्र परम आहे. मानवी मनाचे प्रगाढ ज्ञान, विलक्षण बुध्दिमत्ता, वाचन चिंतनाच्या जोरावर आपल्या वाणीनं सगळयांना प्रभावित करणायची क्षमता असलेला सर्वगुणसंपन्न असा परम आहे. त्याचा एक प्राध्यापक ते अध्यात्मिक गुरू पर्यंतचा प्रवास सदर कादंबरीत व्यक्त होतो. तो स्वत: काही बोलत नाही इतर चार पात्रांच्या माध्यमातून त्याची व्यक्तिरेखा स्पष्ट होत जाते. त्या पात्रांमध्ये विद्या, प्रेमा, योगेश क्रांती यांचा समावेश होतो. या चार मधील पहिली विद्या जी परमच्या व्यक्तीमत्वानं प्रभावित होते. विशेषत: परमच्या वाणीनं, परमलाही विद्या आवडते. जेव्हा विद्या परमला तुला माझ्यातलं काय आवडलं? असे विचारते तेव्हा परम म्हणतो, '' विद्या, मानवी वर्तनाचं विश्लेषण करणं फार अवघड असतं. तू तेच करायला मला सांगते आहेस. एखादी भावना मनात जागी होते. ती का जागी झाली हे सांगणं फार अवघड असतं. काही कारणं भूतकाळात रूजलेली असतात काही वर्तमानात.'' या आणि अशा अनेक वाक्यांवर, त्याच्या बोलण्यावर विद्या खूप प्रभावित होते आणि ते दोघे लग्न करतात. पण काही कालावधीनंतर परम तिला छोटया मुलाला सोडून निघून जातो. नंतर परमच्या आयुष्यात प्रेमा नावाची व्यक्ती येते जी या कादंबरीतील दुसरे महत्वाचे पात्र आहे. जी आपल्या वासनांध नव-याला, सासरच्या संवेदनाहीन माणसांना, त्यांच्या बुरसटलेल्या परंपरांना कंटाळलेली असते. ती परमच्या संपर्कात येते. परमचे शिबिरातील उपदेश तिच्या कानी पडतात. तो सांगत असतो, ''तुमचा आनंद तुमच्याच हातात असतो. पण तुम्हाला तो मिळत नाही. कारण तो तुमच्या अंतर्मनात असतो. माणूस कधीच अंतर्मुख होऊन स्वत:च्या सुखाचा शोध घेत नाही. स्वत:ला काय पाहिजे आहे याचा विचार करत नाही. माणूस नावाचा हा प्राणी बहिर्मुखच. नेहमी इतरांविषयी बोलत असतो. इतरांच्या सुख दु:खातच उडया घेत असतो. स्वत:च्या सुखाचा कधी असा कसून शोध घेतो का? घेतला तरी चुकीच्या मार्गाने सुख शोधतो. त्याला वाटते, सुख म्हणजे पैसा, सुख म्हणजे बंगला, गाडी. सुख म्हणजे रेडिओ ऐकणे, सिनेमा बघणं, परीक्षा देण त्यात चांगले माक्र्स मिळविणे. पण यानं खरं सुख लाभतं का? अजिबात नाही. हे खरं सुख नाहीच. हे रस्ते म्हणजे दु:खांवर झाकण टाकण्याचा प्रयत्न. यांनी दु: नाहीसं होत नाही. काही काळ नजरेआड होतं इतकच. वर घातलेल्या झाकणाला जरा फट पडली की आतलं भळभळतं| दु: उसळी घेऊन बाहेर येतच.'' अशा परमच्या वचनांनी ती प्रभावित होते. आपल्या नव-याला मुलाला सोडून अर्थात आपला संसार सोडून परमसोबत पळून जाते. परमला साथ देते. त्याचा आश्रम उभा करण्यामध्ये संपूर्ण जबाबदारी घेते करते मग परमचा परमानंद गुरूजी होतो. पण कालांतराने परम सुनंदाला जवळ करतो. प्रेमाला दुय्यम स्थान देतो. तिला एकाकी पाडतो. शेवटी प्रेमा त्याला सोडून निघून जाते.
तिसरे पात्र योगेश जो आपल्या डॉक्टर वडिलांच्या सतत धाकानं आत्मविश्वास हरवून बसलेला असतो. अशा परिस्थितीत तो परमानंद गुरूजींच्या संपर्कात येतो, त्यांच्या शिबिरात सहभागी होतो. गुरूजी म्हणत असतात,''सत्य आणि आभास यांच्यातील गोंधळ म्हणजे जीवन. या गोंधळात आपण अडकून पडलेलो असतो. मनात संभ्रम असतात. चूक काय आणि बरोबर काय याचा निंर्णय घेता येत नसतो. असं फरफटत जाणं आणि पैसे मिळविण्यासाठी करावी लागणारी नित्यकर्म करणं म्हणजे आयुष्य'' अशा अनेक वाक्यांनी योगेशच्या जीवनाला दिशा मिळत जाते. पण आश्रमातील वास्तव गोष्टी योगेशला कळतात तो भूतकाळात जाऊन त्याचं विश्लेषण करत राहतो.
कादंबरीतील चौथे पात्र क्रांती जी लहाणपणी मामाच्या वासनेला बळी पडलेली असते. आपला प्रियकर जितूच्या आत्महत्येमुळे डिप्रेशनमध्ये गेलेली असते. ती निम्फोमॅनिअॅक, हायपर सेक्शूअल झालेली असते. ती परमानंद गुरूजींच्या संपर्कात येते. गुरूजी सांगत असतात,''तुमचं मन म्हणजे उत्साहानं उसळणारं एक कारंजं आहे. खरं नाही ना वाटत तुम्हाला हे? पण ते सत्य आहे. लहान मुलाकडे कधी बघितलंय तुम्ही? किती उत्साहात असतात. सतत खिदळत असतात. चेहयावर निरागस हास्य असतं. तुमचं मन या लहान मुलासारखंच होतं. पण ते काळवंडलं. का? तर तुमच्यासमोर प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांचं तुम्ही कोळयासारखं सुंदर जाळ निर्माण केलत आणि त्यात स्वत: अडकलात. अनेक दडपणं आली तुमच्यावर. अनेक दारं, अनेक वाटा बंद करायला लागल्या. काही स्वेच्छेनं, काही नाइलाजानं. गुदमरून टाकलत तुम्ही तुमचं मन. त्याला मोकळ होऊच दिलं नाही. साखळदंडानं बांधल्या गेलेल्या या मनानं कसा घेणार तुम्ही सुखाचा शोध? आनंदाच्या मार्गावरून जायचं असेल तर मन मोकळ करायला पाहिजे. दारं उघडायला पाहिजेत. साखळदंड झुगारून द्यायला पाहिजेत. आहे तुमची तयारी? कोणते असतात हे साखळदंड? संस्कार परंपरा. आपण यांचे गोडवे गातो. आपली परंपरा पुढच्या पिढीनं चालवावी असंच प्रत्येक पिढीला वाटत असतं. तुमची बापपिढी तर तुमच्यावर परंपरा लादतच असते. त्यातलं काय घेण्यासारखं असतं आणि काय सोडण्यासारखं याचा तुम्ही कधी विचार करता का? नाही. मग तो या क्षणापासून करायला लागा. बुध्दीवादी पध्दतीनं परंपरांकडे बघा. त्यातले योग्य वाटतील पटतील ते घ्या. बाकीच्या फेकून द्या. बघा किती मुक्त वाटेल तुम्हाला. सुखाच्या वाटेवरून चालायचे असेल तर परंपरा झुगारून द्यायचं पाप तुम्हाला करावेच लागेल. पाप त्यांच्यादॄष्टीने असतं. आपल्यासाठी ते पुण्यकर्म ठरतं.'' ती योगेश सोबत लग्न करते चार वर्षात घटस्फोटही घेते.
अशा प्रकारे परमचा प्राध्यापक ते अध्यात्मिक गुरूपर्यंतचा प्रवास या चार व्यक्तीरेखांच्या कथनातून स्पष्ट होत जातो. चारी पात्रांच्या समस्या वेगवेगळया आहेत. ही चारही पात्रे वेगवेगळया कुटंबातील, वेगवेगळया सामाजिक, मानसिक परिस्थितीत वाढलेली आणि वेगवेगळया समस्या असलेली आहेत. वर्तमान काळात आपण पाहतो बुवाबाजीचे प्रस्थ वाढत आहे. त्या अनुषंगाने ही कादंबरी महत्वाची ठरते. अध्यात्माच्या नावाखाली गुरू बाबांचे वाढते प्रस्थ आणि लोकांची एका अर्थानं फसवणूक हे समाजातील वास्तव कादंबरी अधोरेखित करते. प्रारंभीच 'गुरूजींची हत्या का झाली' ही गोष्ट कादंबरीमध्ये कुतूहल वाढवून ठेवते. कम्यून, तिथली शिस्त, तसेच तिथले लहान-सहान संदर्भ, बारकार्इने केलेले गहन मनोविश्लेषणामुळे वाचक वाचताना गुंग होतो. सदर कादंबरीत मानसशास्त्र, तत्वज्ञान, सामजशास्त्र .मधील खूप सारे संदर्भ आलेले आहेत. लेखिकेच्या व्यापक जीवनानुभव, अफाट वाचन, चिंतन, मननाचा परिचय देणारी ही कादंबरी वाचकास समॄध्द करते.पूर्वदीप्ती शैलीचा (Flashback) वापर केला गेला आहे. प्रत्येक पात्रास प्रारंभी परमच्या मॄत्यूची बातमी कळते आणि मग त्यांच्यासमोर त्यांचा भूतकाळ येतो. मग प्रत्येक पात्र भूतकाळातील परमबरोबरची आपली कथा सांगतात त्यातून परमची व्यक्तिरेखा उलगडली जाते. कादंबरीमध्ये फ्रार्इडने सांगितलेल्या कामप्रेरणेचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अत्यंत कलात्मकतेनं वास्तवादी पात्रांच्या माध्यमातून अभिव्यक्त झाला आहे. कादंबरीत लैंगिकतेसंदर्भात ही पात्र आपल्या जीवनाविषयी स्वत: बोलतात. पात्रमुखी निवेदन पध्दतीचा वापर केला गेल्याने कादंबरी वाचकाच्या मनावर पकड घेते. कादंबरीस साजेसं मुखपृष्ठ राजेंद्र गिरधारी  यांनी तयार केलेले आहे. एकंदरीत अध्यात्मिक चिंतन, जीवनविषयक खोल अनुभव, अनेक पुस्तकांचे संदर्भ, नातेसंबंधांचे मार्मिक विश्लेषण, पात्रांचे मनोविश्लेषण, पात्रानुकूल भाषा, शब्द निवड, मानसशास्त्रीय संकल्पना असा विस्तॄत पट असलेली ही कादंबरी वाचकाला प्रभावित तर करतेच पण त्याचवेळी कामप्रेरणेकडे बघण्याची नवी दॄष्टी देते.

प्रा.शौकत आतार
आर्टस अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे

पुस्तकाचे नांव : देहाचिये गुंती
लेखिका : डॉ. अंजली सोमण
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
पॄष्ठे : 436
किंमत: 400

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा