रविवार, २१ जून, २०२०


कोविड-19 आणि ई-टिचिंग
   सध्या कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीचा आर्थिक, सामाजिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रावर ही परिणाम दिसून येतो आहे. जगभरातील अनेक शैक्षणिक संस्था कोविड-19 मुळे बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन,अध्यापन,शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत ही साथ आटोक्यात येत नाही किंवा लस निर्मिती होत नाही तोपर्यंत येत्या काळात शिक्षकांना अध्यापनाचे कार्य अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन करावे लागणार आहे असे एकूण दिसते आहे. त्यामुळे शिक्षकांनी काळाची ही नवी आव्हाने स्विकारून तंत्रज्ञानाचा आधार घेत तंत्रज्ञानकुशल होणे ही काळाची गरज बनली आहे. तर या आधारे 'फिजिकल डिसटेन्सिंगठेवत अध्यापनाचे कार्य निरंतर ठेवता येऊ शकते. अशा या अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वप्रथम सर्व शिक्षकांनी नवे तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे.वास्तविक पाहता हे नवे तंत्रज्ञान अशा निकराच्या,आणीबाणीच्या प्रसंगी संवाद टिकवून ठेवण्यासाठी वरदान ही ठरत आहे. सध्या आपण पाहतो आहोत की राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर शासन,प्रशासन,विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत यंत्रणाशी, लोकांशी संवाद ठेवत आहेत, परिस्थिती हाताळत आहे.
आज या कोविड-19 मुळे आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगाच्या अनुषंगाने आँनलाईन अध्यापनासाठी शिक्षकांनी झूम,गुगल हँगआऊट,गुगलमीट,स्कायप तसेच फेसबुक,यूट्यूब,इंस्टाग्राम,ट्विटर इ.चे लाईव्ह .कोणत्याही प्लॅटफॉर्मचा आधार घेत विद्यार्थ्यांशी आपल्या विचारांची देवाण-घेवाण करणे शिक्षकांना उचित ठरणारे आहे. त्याचबरोबर गुगल फॉर्म, गुगल क्विझ,एडमोडो,टेस्टोमोझ क्विझ,गुगल क्लासरूम,ब्लॉग,व्हाट्सएप ग्रुप,फेसबुक ग्रुप,यूट्यूब चैनेल इ.अशा अत्याधुनिक गोष्टींचा वापर करत अध्यापन करणे गरजेचे झाले आहे. आज इंटरनेट वर माहिती चा भला मोठा अविश्वसनीय संग्रह लेखन,चित्र,दृक,श्रव्य रूपात उपलब्ध झालेला आहे.शैक्षणिक,आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने विविध भाषेत,विविध रूपात इंटरनेट च्या माध्यमातून यूट्यूबवर व्हिडीओ रूपात सहज सुलभ उपलब्ध झाली आहेत.असंख्य वेबसाईट, अँप्लिकेशन्स, ई-बुक्स,ई-नियतकालिके इ.ची संख्या तीव्र गतीने वाढत चालली आहे.प्रत्येक क्षणाला त्यामध्ये भर पडतेच आहे.पण निव्वळ संग्रह असून चालणार नाही. त्यातले निवडक,आवश्यक काय हे सांगण्यासाठी एका शिक्षकाची भूमिका ही तितकीच महत्त्वाची आहे.या माहिती तंत्रज्ञानात झालेल्या अभूतपूर्व क्रांतीमुळे शिक्षकांना आवश्यक असणाऱ्या माहिती, ज्ञानाची स्रोतसामग्री पुस्तकांबरोबर इंटरनेटवर कमी वेळेत उपलब्ध होते आहे. अर्थात जिज्ञासु,ज्ञानपिपासु व्यक्तीला हे तंत्रज्ञान वरदान ठरते आहे.
हे सर्व सांगत असताना याही गोष्टीचा विचार होणे  आवश्यक आहे की आपल्या  देशातील ग्रामीण,अविकसित,दुर्गम, आदिवासी इ. प्रदेश जिथे अजून मूलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत.अशा भागातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन, अध्यापना संदर्भात ही शासकीय, प्रशासकीय स्तरावर विचार व्हायला हवा असे वाटते.मग त्यांच्या साठी आवश्यक असणारी साधनसामग्री असेल किंवा इतर सुविधा असतील.पण त्यांना या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम ठरवून ठोस पाऊले उचलणे ही तितकेच आवश्यक आहे. या सर्व समस्यांबरोबरच तांत्रिक अडचणी, रेंज, अप्लीकेशन ची तांत्रिक बाजूचे ज्ञान, साधनसामग्री, आर्थिक अभाव, शैक्षणिक वातावरण, तंत्रज्ञान प्रशिक्षित मनुष्यबळ, तंत्रज्ञान वापरण्यासाठी विद्यार्थ्याना आवश्यक असणारे ज्ञान इत्यादी गोष्टी ही महत्वाच्या आहेत. खरं म्हणजे वर्गामधील प्रत्यक्ष अध्यापन आणि हे व्हर्च्युअल (आभासी) जगातील अध्यापन यात परिणामाच्या अंगानं भरपूर तफावत आहे. तरीपरंतु काळाची गरज म्हणून याचा उपयोग करणे क्रमप्राप्त आहे. आणि तो करत असताना वर उल्लेखित केल्याप्रमाणे सर्वांना या प्रवाहात सामील करून घेतले पाहिजे. अन्यथा एकीकडे या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शिक्षण घेणारा एक वर्ग आणि दुसरीकडे या सुविधांपासून वंचित एक वर्ग तयार होईल जे उचित असणार नाही .
ई-टिचिंग, ई-लर्निंग हे कालसुसंगत,अद्ययावत आहेच पण त्याचबरोबर पारंपारिक पध्दतीच्या प्रत्यक्ष अध्यापन पध्दतीला दुर्लक्षून चालणार नाही. अन्यथा आपण विद्यार्थ्यांचे रोबोटमध्ये रूपांतर करू.कारण विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाबरोबरच -हदयाचा विकास,नीतिमूल्यांचा विकास इ.ही आवश्यक आहे. वर्ग अध्यापनामध्ये सहअस्तीत्व, सामुहीकतेची भावना दृढ होते, वैचारिक देवाणघेवाण, विविध सामाजिक आर्थिक स्तरातील विद्यार्थ्यांच्या आंतर्क्रिया इत्यादी मधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार येण्यास मदत होते. पण सध्याची कोविड-19 ची परिस्थिती पाहता काही कालावधी पर्यंत  तरी  आनलाईन अध्यापन (ई-टिचिंग) करणे विद्यार्थी, शिक्षक इत्यादी सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे असे वाटते.

-प्रा.शौकत आतार
आर्टस अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा