घालमेल
झोपेतून दचकून जागा झालो.छातीत धडधडत होतं.घाबरल्यागत झालं....!"का दचकलो ?" हे आठवण्यासाठी डोळे स्थिर ठेऊन धडधडत्या छातीनं आठवण्याचा प्रयत्न करू लागलो.काही केल्या आठवेना.पण आपण स्वप्नात घाबरलो कशाला तरी.. एवढं मात्र नक्की...! मग 'तोच' स्वप्नाचा विचार मनात येऊ लागला.थोडी अनामिक भितीही वाटू लागली. पण नेमकी कशाची? ते ही कळेना. डोळे झाकले.. पण झोपही लागेना.अजून अंधारच दिसत होता. नेमके किती वाजलेत हे पाहण्यासाठी व झोप लागेना म्हणून सवयीप्रमाणे उशाला ठेवलेला मोबाईल घेतला.अंधारात डोळ्यावर स्क्रीन खूप चमकत होती.ब्राईटनेस कमी केला.पहाटेचे चार वाजले होते. डोळ्यांवर झोप खूप होती.पण येत नव्हती.कारण डोक्यात विचारचक्र सुरूच होते.मग व्हाट्सएपच,फेसबुक चाळलं.त्यात तास गेलेला कळलाही नाही.मी नेहमी असेच करतो.जेव्हा जेव्हा मनाला उदास उदास वाटते,काही सुचत नाही.तेव्हा तेव्हा मी मोबाईलला जवळ करतो. मग रात्र असो नाहीतर दिवस कधीही. आता मात्र मोबाईल बघून डोळे चुरचुरायला लागले.अन् मोबाईल बघता- बघता झोपीही गेलो.दोनेक तासानंतर उठलो.मात्र दोनेक तासाच्या या झोपेमधली संदर्भहीन स्वप्ने आठवायला लागली.खरं म्हणजे ही स्वप्ने की विचार ...? की झोपलोच नव्हतो आपण...? विचारच करत होतो की काय..?विचारांच्या तंद्रीत फक्त शरीर शिथिल झालं होतं की काय?नेमकं काहीच कळेना.पत्नी किचनमध्ये काहीतरी बनवत असण्याचा आवाज येत होता. आणि मुलगा मोबाईल वर काहीतरी गेम खेळत होता आणि दोन वर्षाची मुलगी त्याच्याकडील मोबाईल घेण्यासाठी धडपडत होती.तसाच बिछान्यावर पडून राहिलो.अचानक भिंतीवरच्या कँलेंडरकडे लक्ष गेलं आणि आजच्या 23 मे च्या तारखेकडे बघत-बघत गेल्या दोन महिन्यापासून घेत असलेल्या अनुभवांच्या विचारांची मालिका डोक्यात सुरु झाली. साधारणपणे तीन-चार महिन्यापूर्वी चीनच्या वुहान शहरात सरकारने एक हॉस्पिटल विक्रमी कालावधीत बांधून पूर्ण केले हे ऐकलं होतं,वाचनात आलं होतं,तिथे कोविड नावाच्या रोगाचे पेशंट वाढताहेत हे पण ऐकत होतो.पण थोड्याच दिवसात जेव्हा भारतातही पेशंट सापडू लागले. हळूहळू वाढायला लागले.महाराष्ट्रात ही सापडू लाले,वाढू लागले.अन् बघता-बघता जिल्ह्यात. गावात.मग मात्र पायाखालची वाळू सरकू लागली.सामाजिक व इतर माध्यमांवर येणारे असंख्य मेसेजेस,बातम्या विशेषत: सतत व्हाट्सएपचे मेसेजेस ,फेसबुकवरच्या पोस्टी, न्यूज चँनेल्सच्या ‘कोरोना ब्रेकिंग’ च्या कानावर आदळणा-या बातम्या,फोनवर ऐकत असलेले कोरोनाची आकडेवारी, वर्तमानपत्रातील कोरोना चा'हाहाकार','धुमाकूळ',सारख्या हेडिंग्ज इ.नी मनात घर कधी केलं.अन् सतत त्याच विचारात मन गुंतू लागलं. हा 'कोरोना' संपूर्ण जग आपल्या कवेत घेईल काय? घेतलं तर काय? हळूहळू सार्वजनिक जीवन संपेल काय? वयोवृद्ध अन् लहान मुलांना घराबाहेर पडता तरी येईल काय..? अन जर नाही पडता आलं तर ते किती दिवस घराच कोंडल्यागत राहतील? आपणास तर किती बोअर झालय. किती कंटाळा येतोय. प्रसार माध्यमातून रस्त्यावर असणाऱ्या कामगार, मजूरांच्या वेदना ऐकून,बघून काळीज हेलावतय.,शेतक-यांची पिकं,माल सडतोय.नुकसान पाहवत नाही. दिवसागणिक रूग्णांची संख्या वाढतेय.ही कधी कमी येईल? प्रसार माध्यमं गोंधळात भर टाकताहेत. अगदी पहिल्या महिन्यापासून सांगताहेत लस तयार झालीय. जागतिक आरोग्य संघटना सांगत्येय कोरोना संपणार नाही.मी विचार जास्त करतोय म्हणून असे वाटतेय काय? काहीच समजत नसायचे. मी फक्त विचार करत रहायचो.भारताची परिस्थिती किती भयावह असेल?कल्पना करवत नाही.असे जरी म्हणत असलो तरीपण अनायास कल्पना केली जायची.लाखों,करोडोंच्या संख्येने लागण झाली तर…?किती भयावह असेल परिस्थिती.डोळ्यासमोर चित्र उभं रहायचं. हळूहळू मनात नकारात्मकता घर करायला लागली होती. आणि बघता-बघता राहत असणाऱ्या शहरातील बहुतांश भागात कोरोना पसरलाही होता. त्यामुळे मग कडकडीत बंद.जवळपास सलग सात दिवस.मग हळूहळू घरातील अत्यावश्यक वस्तू संपायला लागल्या होत्या.गेल्याच महिन्यात मी अत्यावश्यक किराणा आणण्यासाठी घरापासून साधारणत: 300 मीटरच्या अंतरावर साहित्य आणण्यासाठी दुकानात खबरदारी घेऊन गेलो होतो.मास्क, डोक्यावर टोपी,अगदी गाँगल इ.आणि आल्याबरोबर कडक गरम पाण्यानं आंघोळ देखील केली होती. आणि लगेच दोन दिवसांनी बातमी आली होती की त्या दुकानाच्या एरियामध्ये एक कोरोनाचा पेशंट सापडलाय.बातमी ऐकून काळजात धस्स झालं होतं .दुकानात गेल्यापासूनचा सगळा क्रम आठवायला लागलाय होता.मनात नको-नको ते विचार यायला लागले होते.वाटलं होतं त्या पेशंट किंवा त्याच्या संपर्कातील कुणी त्या दिवशी दुकानात तर आला नसेल ना....?त्याचा आणि आपला संपर्क नकळत आला नसेल ना....? मग माझ्या नाकात सेंशंशन जाणवाय लागलं होतं .उगीच सर्दी झाल्यासारखं किंवा होते आहे असं वाटू लागलं होतं. मग बेसिनजवळ जाऊन खाकरणे.नाकात श्वास जोरात घेऊन सर्दी झालीय का ते खात्री करायला लागलो होतो. स्वत:ला कोरोनाच्या लक्षणानुसार चेक करायला लागलो होतो. मग न राहून पत्नीनं विचारलं," का हो, काल दुपारपासून तुम्ही खूप शांत आहात..काही झालय का?" मग मी " काही नाही" म्हणालो .अस्वस्थता वाढतच चालली होती.विचारचक्र जोरात सुरू होतं.दुकानात जाण्यापासून ते परत येईपर्यंतच्या सर्व बारीक-सारीक हालचाली तीव्रतेनं मेंदूवर जोर देऊन आठवायचा प्रयत्न करत होतो. मनात हळूच शंका येत होती." कदाचित आपल्याला कोरोना व्हायला लागलाय वाटतं..."कधी वाटायचं... नाही... नाही... आपण तर खूप दक्ष होतो.काळजी घेतली होती.नसेन.पण मग दुसरं मन म्हणायचं," मग सर्दी झाल्यासारखं का होतय नाकात..?अन् आता तर घशात खवखवल्यासारखं पण का व्हायला लागलय?.शिंकापण का ही येताहेत मधून मधून?" काहीच कळायला मार्ग नव्हता.मग मी लगेच मोबाईलवर गुगल, यूट्यूब इ.वर कोरोनाच्या लक्षणासंदर्भातील माहिती वाचायचो, व्हिडिओज बघायचो.पण वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य व्हिडिओज आणि माहिती बघून, वाचून आणखी कन्फ्यूज व्हायचो.म्हणजे कुणी म्हणतंय,'कोरोनाची लक्षणं सगळ्यांना सगळीच दिसत नसतात',तर कुणी म्हणतंय,'काहींना काहीसुद्धा लक्षणं दिसत नाहीत'.तर कुणी 'आणखी नवीन लक्षणं आलीत' वगैरे गोंधळात भर टाकणारं हे सगळं गोंधळ वाढवीत होते.मग मी विचार केला होता की, आपण आता काहीच विचार करायचा नाही. पण संकल्प जेवढ्या ताकतीनं केला होता तितक्याच ताकतीनं ते विचार मनात यायलापण लागले होते. मध्येच मी माझ्या निरागस खेळणाऱ्या लहान मुलांकडं बघायचो .त्याचं निरागसपणे खेळणं बघून मला छान वाटायचं. पण हा 'कोरोनाचा' विचार मिठाचा खडा बनून मध्येच टपकत होता. मग मी अस्वस्थ व्हायचो. काही सुचायचं नाही.मग त्यातून विचारांची साखळी सुरू व्हायची.समजा आपण पाँझिटिव्ह असेल तर काय? समजा त्यातून बरेवाईट काही झालं तर माझ्या कुटुंबाचं काय? माझ्या बायको, मुलांचं मुलाचं काय? माझ्यामुळे माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांना त्याची लागण झाली तर काय? मग सगळंच संपणार तर नाही ना? मरण कुणाला हवं असतं.जीवन सगळ्यांना प्यारं असतं.पण मला मात्र मरणाची भिती वाटू लागली होती .मग ही भितीही मनात घर करू लागली होती.'आपण मेलो तर' …….हा विचार खोलवर मूळ धरू लागला होता.मग त्या विचारातून अनेक भयावह विचारांची मालिका सुरू झाली होती…..माझी नुसती घालमेल होत होती …….घालमेल...!
- स.दा.घालमेलेकर
' विचारांच्या कोरोन्यातून अन् आपल्याच मनाच्या जिन्यातून उतरताना' या 'कथाकीलेख' या आगळ्यावेगळ्या लेखनातून....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा