मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्याची प्रासंगिकता

(मुंशी प्रेमचंद यांच्या जयंती निमित्त लेख)
भारतीय साहित्यातील ज्या लेखकांनी विश्व साहित्याला प्रभावित केले आहे अशा मोजक्या साहित्यिकांमध्ये हिंदी साहित्याचे महान लेखक मुंशी प्रेमचंद यांचे नाव अग्रक्रमाने येते. प्रेमचंद्र हिंदी साहित्यातील वास्तववादी लेखन करणारे पहिले साहित्यकार होते. त्यांचा जन्म 31 जुलै, 1880 रोजी झाला त्यांना एकूण 56 वर्षांचे आयुष्य लाभले होते. त्यात त्यांनी पंधरा कादंबऱ्या,तीनशेपेक्षा जास्त कथा, तीन नाटके, सात बालसाहित्याची पुस्तके तसेच हजारो पानांचे संपादन इ. केले. प्रेमचंद यांच्या जीवन व साहित्याला समजून घेण्यासाठी तत्कालीन सामाजिक, राजकीय, साहित्यिक, आर्थिक इ. परिस्थिती समजून घेणे आवश्यक ठरते. प्रेमचंद यांच्या काळात भारतात इंग्रज राजवट होती अर्थात भारत पारतंत्र्य अवस्थेत होता. त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या दूषित वातावरण होते. साहित्याच्या दृष्टीने विचार करावयाचा झाल्यास त्या काळात हिंदी चे इतर लेखक राजा-राणी, रहस्यमयी, रोमांचकारी,काल्पनिक साहित्य लेखन करत होते अर्थात साहित्यात वास्तवापेक्षा काल्पनिक लेखन करण्यावर अधिक भर होता.प्रेमचंद यांनी भूतकाळातील गौरवगाण व भविष्यातील स्वप्नरंजन टाळून वर्तमानातील वास्तव आपल्या साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात, "वर्तमान ही सबकुछ है. यदि हम भविष्य की चिंता करते हैं, तो यह हमें कायर बना देती है और यदि भूत का भार उठाते हैं, तो यह हमारी कमर तोड़ देती है" प्रेमचंद यांनी त्याकाळी इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध जाऊन देशप्रेमाने ओतप्रोत असलेला 'सोजेवतन' नावाचा ग्रंथ उर्दूमध्ये लिहिला. तो ग्रंथ इंग्रजांनी तात्काळ जप्त केला आणि त्याच्या प्रती जाळल्या. प्रेमचंद यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली नोकरी सोडली आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील झाले त्याचबरोबर नैतिक मूल्यांची आपल्या स्वतःच्या आयुष्यात जपणूक करत साहित्यामधून समता, बंधुता, एकता इत्यादी मूल्यांचा प्रचार व प्रसार केला. स्वतः एका बालविधवेशी विवाह करून एक आदर्श घालून दिला. प्रेमचंद यांनी आपल्या साहित्यातून समाजातील उपेक्षित, वंचित, गरीब, कष्टकरी, शेतकरी, दलित, स्त्री इत्यादी वंचित वर्गाच्या समस्यांचे चित्रण केले. त्यांच्या वेदनांना, दुःखांना, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला आपल्या लेखनाच्या माध्यमातून वाचा फोडली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या लेखनात हिंदू-मुस्लिम ऐक्य, सांप्रदायिक सद्भाव इत्यादी गोष्टींनाही स्थान दिले.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारतातील समाजव्यवस्था, जमीनदारी प्रथा, औद्योगिकीकरण इत्यादी गोष्टींचा समाज जीवनावर झालेला परिणाम प्रेमचंद यांच्या साहित्यात दिसून येतो. त्यांनी आपल्या साहित्यामध्ये भ्रष्टाचार, जमीनदारी, कर्जखोरी, गरीबी,सांप्रदायिकता इत्यादी विषयावर लेखन केले. खर्या अर्थाने त्यांचे साहित्य तत्कालीन समाज जीवनाचा व मानवी प्रवृत्तींचे वास्तविक प्रतिबिंब आहे तसेच ते वास्तवावर आधारित असल्याने कालातीत आहे.प्रेमचंद यांची ‘गोदान’ नावाची कादंबरी विश्व साहित्यातील एक अप्रतिम साहित्यकृती ठरली. त्यामध्ये भारतीय शेतकऱ्यांच्या वेदनांना, समस्यांना अभिव्यक्त केले गेलेले आहे. या कादंबरीचे वर्णन ‘किसान जीवन का महाकाव्य’ म्हणून ही केले जाते. त्याचबरोबर प्रेमचंद यांनी समाजातील सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या साहित्यातील प्रमुख पात्रांच्या रूपात चित्रित केले . प्रेमचंद यांनी साध्या, सरळ कथेतून समाजाला मोलाचा संदेश दिला.
प्रेमचंद यांचे साहित्य भारतातील सर्व व जगातील ही अधिकांश भाषांमध्ये भाषांतरित झालेले आहे. तसेच त्यांच्या कथा-कादंबऱ्यावर आधारित काही फिल्म, टीव्ही धारावाईक निर्माण झाल्या ज्यामध्ये शतरंज के खिलाडी,सद्गति, गोदान,गबन इत्यादी फिल्म बनविल्या गेल्या. तर गुलजार यांनी ‘तहरीर मुन्शी प्रेमचंद’ की या शीर्षकाने काही कथा निर्देशीत केल्या. ज्यांना आज युट्युब वर लाखो जणांनी बघितले आहे, आपणही बघू, ऐकू शकतो. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये युट्युब सारख्या माध्यमावर ‘कहानी सुनो’ या चॅनेलवर प्रेमचंद यांच्या कथांचे समीर गोस्वामी यांच्या आवाजात रेकॉर्डिंग करण्यात आलेले आहे त्याही आपणासाठी उपलब्ध आहेत .तसेच अनेक वेबसाईटवर,पीडीएफ,आडिओ स्वरूपात प्रेमचंद यांच्या लेखनाचा संग्रह आपण इंटरनेटवर बघू ,ऐकू, वाचू शकतो.
प्रेमचंद एका साहित्यिक युगाचे प्रवर्तक आहेत . त्यांच्या साहित्याने समाजाला एक दिशा देण्याचे तसेच तत्कालीन जनतेमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य केले. जातिभेद, अंधश्रद्धा, धर्मांधता, चुकीच्या रूढी परंपरा इत्यादी गोष्टींवर त्यांनी आपल्या लेखनातून कठोर प्रहार केला. आपल्या लेखणीतून धार्मिक, सामाजिक आणि संस्कृती शोषणाविरुद्ध त्यांनी नेहमी आवाज उठवला. शोषितांचे जग साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर आणले. आज काही अंशी प्रेमचंद काळाच्या तुलनेत परिस्थिती बदलली असली तरी सामाजिक, आर्थिक समस्या आपल्या समोर आ वासून उभ्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, दलित इत्यादींचे प्रश्न आहेत. आज खऱ्या अर्थाने प्रेमचंद यांच्या विचारांची, साहित्याची समाजाच्या विकासासाठी खूप आवश्यकता आहे असे वाटते. आजच्या कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये मानव जातीवर आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जात, पंथ, धर्म,वर्ग,वर्ण इत्यादी सर्व भेदभाव विसरून एकजुटीने या महामारीचा मुकाबला करणे खूप आवश्यक आहे. आज 'वसुधैव कुटुम्बकम' किंवा 'हम सब एक है' चा मंत्र उपयोगी पडू शकतो. प्रेमचंद यांनी आपल्या साहित्यामधून समस्त मानवजातीला हाच समतेचा, एकतेचा, बंधुत्वाचा संदेश दिलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा