'मोबाईल' वर बोलू काही…
आधुनिक काळात माणसाच्या जीवनात शिक्षण, सभ्यता, विज्ञानाचा प्रवेश झाला. विज्ञानाच्या जोरावर माणसाने नव-नवे शोध लावले. माणूस दिवसेंदिवस भौतिक विकास करत गेला. मग नवनवं तत्रज्ञान आलं. इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक नवइलेक्ट्रॉनिक साधने आली. कम्प्यूटर, इंटरनेट आलं. डिजिटल प्रसार माध्यमांचा विकास होत गेला. मोबाईल क्रांती झाली. मोबाइल अँड्रॉइड स्वरूपात आला. मोबाइलमध्ये इंटरनेट आले. गुगल, गुगल क्रोम, मोझिला फायफॉक्स सारखे ब्राऊजर्स आले. फेसबुक, व्हॉटसअप, यूटयूब व तत्सम अनेक अप्लिकेशन्स आली. येताहेत. या सर्वांच्या मदतीने माणसाला इंटरनेटवरील माहितीचे विशाल भांडार खुले झाले. माणूस इंटरनेटच्या सहायाने कधीही, कुठेही, कितीही माहिती प्राप्त करू लागला. अन बघता-बघता 'कर लो दुनिया मुट्ठी में' प्रमाणे माणसाच्या मुट्ठीत सारं जग आलं. दिवसेंदिवस नवनवें शोध लागताहेत. तंत्रज्ञान प्रगती करतेय. माहिती तंत्रज्ञानाने मनुष्याच्या दैनंदिन व्यवहारात कमालीची गती आणलीय. आज अनेक गोष्टींचे बुकिंग घरबसल्या ऑनलाइन होतय. आज विविध भाषांमधील बरीच दैनिक वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके इ. नियतकालिके तसेच पुस्तके इंटरनेटच्या माध्यमातून आपण कधीही, कुठेही आपण वाचू बघू शकतो. 'स्टोरीटेल' सारख्या अप्लिेकशन्सच्या माध्यमातून आपण पुस्तके ऑडिओ स्वरूपात ऐकू शकतो. अर्थात माहिती मिळविण्यासाठी स्थळ, काळ, वेळेची मर्यादा राहिलेली नाही. आज झपाटयाने बदलत चाललेल्या या जगात आपणास टिकून राहण्यासाठी तंत्रज्ञान साक्षर असणे ही काळाची गरज बनली आहे. गुगलने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज बहुतांश लोक आपले प्रश्न, जिज्ञासा, शंका गुगलवर टाइप करताना दिसताहेत. 'क्वोरा' सारखी अप्लिकेशन्स अशा प्रश्नांची उत्तरे देताहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, कॄषी, स्थापत्यशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र इ. पैकी कोणतीही विद्याशाखा असो किंवा सामाजिक, राजकीय, सांस्कॄतिक, ऐतिहासिक, साहित्यिक इ. पैकी कोणतेही क्षेत्र असो, पण गुगल ने या सर्वातील माहितीचा, ज्ञानाचा प्रचंड मोठा अविश्वसनीय असा संग्रह जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना चोवीस तास उपलब्ध करून दिला आहे.त्याचबरोबर यूटयूब च्या माध्यमातून आपणास प्रचंड मोठे माहितीचे, ज्ञानाचे दालन खुले झाले आहे. जगभरातील विविध भाषा तसेच क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे व्हिडीओ आपण चोवीस तास कधीही, कुठेही बघू, ऐकू शकतो.
पण हे जरी खरे असले तरी काही माणसे या माहिती तंत्रज्ञानाच्या, इंटरनेटच्या, सोशल मिडियाच्या विश्वात इतकी रमत गेलीत की त्यांना या गोष्टीचे 'अडिक्शन' झालय. काहीजण फेसबुक, व्हाटसअप, यूटयूब, टिकटाक इ. अप्लिकेशनमध्ये तासनतास अव्याहतपणे डोकं खुपसून बसताहेत. मनोरंजनाच्या नावाखाली आपल्या आयुष्यातील किंमती वेळ ते यामध्ये खर्च करताहेत. एकदा का या गोष्टींची सवय लागली की मग जडलेली सवय सोडणं कठीण होऊन बसतं. अशां अडिक्टेड लोकांमध्ये सर्व वयोगटातील व्यक्तींचा कमी अधिक प्रमाणात समावेश आहे.खरं म्हणजे अँड्रॉइड मोबाईलचे फायदे,तोटे आहेत. वास्तविक पाहता कोणत्याही गोष्टीला सकारात्मक, नकारात्मक बाजू असतात हे वेगळ सांगायला नको. याबाबतीत अनेक तज्ज्ञांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. आज भारत जगामध्ये ज्याप्रमाणे लोकसंख्येत चीनपाठोपाठ दुस-या स्थानावर आहे त्याप्रमाणे मोबाईल वापरकर्त्या संख्येनुसार चीननंतर दुस-या स्थानावर आहे. मोबाइलच्या अतिवापराचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल, गंभीर परिणाम होत असतात. मूळ मुददा असा आहे की मोबाईल चा वापर हा कशासाठी होतोय आणि किती प्रमाणात होतोय हे तपासणे महत्वाचे आहे. जर तुमच्या व्यवसायाच्या क्षेत्रातील, करियरच्या संदर्भातील माहिती व ज्ञान मिळविण्यासाठी ठराविक मर्यादेपर्यंत वापर होत असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. कारण मोबाईल मुळे मनुष्यास तात्काळ माहिती मिळाल्यामुळे वेळेची खूप बचत झाली आहे. परंतु काहीजण मोबाइलचा अतिरेक करताहेत. ज्यामुळे त्यांच्या शारीरिक, मानसिक अन कौटुंबिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम झालेला आहे. होतो आहे.
मला वाटते माणसानं यासंदर्भात आत्मपरीक्षण करायला हवं. काही प्रश्न स्वत:ला विचारायला हवेत. जसे की दिवसभरात आपण किती तास मोबाईल साठी खर्च करतो? त्यातले किती तास आपल्या करियरसंदर्भात माहितीसाठी असतात? किती वेळ सोशल मिडियासाठी मनोरंजनाच्या नावाखाली देतो? आपल्याला मोबाईल बिना रहावते का? मोबाईल पाहताना वेळेचे भान आपल्याला असते का? इ. सारखे प्रश्न स्वत:ला विचारावेत. उत्तरे नक्कीच मिळतील त्यासाठी फक्त प्रामाणिकपणा जपायचा. मोबाईल हाताळताना डोळे आणि मोबाईल मधील अंतर, मानेची स्थिती, पाठीची स्थिती, डोळयाची स्थिती, पापण्यांची उघडझापेची वारंवारिता, इ. अनेक गोष्टी आपल्या शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम करत असतात. मला वाटते, आपण इतरांची मोबाईल वापरण्याची एकूण वेळ आणि कारणे शोधण्यापेक्षा आपले स्वत:चे आत्मपरीक्षण करावे. आपण किती वेळ देतो ते पहावे. त्याचे परिणाम पण पहावेत. उत्तर समाधानकारक असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण नसेल तर सुधारणा करण्यासाठी लक्ष द्यावे. वेळ द्यावा. शेवटी एकच म्हणावसं वाटतं की मोबाईल आपण वापरायचा. मोबाइलने आपणास वापरता कामा नये. आणि जर मोबाईल आपणास वापरत असेल तर आपल्या अंधकारमय भविष्याचं खापर आपल्याच डोक्यावर फोडायचे दुस-याच्या नाही… ²
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा